सूरज पवार / मडगाव‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीनुसार पावसाळ्यात राज्यात मोठ्या प्रमाणात बेडकांचा संहार केला जातो. बेडकांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून, इंडियन बुल फ्रॉग म्हणून ओळखला जाणारा बेडूक तसेच बेडकांच्या अन्य प्रजाती मोठ्या प्रमाणात दिसेनाशा झाल्या आहेत. राज्यात बेडकांची संख्या घटू लागली आहे. वन खात्यातर्फे बेडूक मारणे हा गुन्हा असून, पर्यावरणासही ते हानिकारक असल्याची जागृती केली जाते. मात्र, जम्पिंग चिकनला चटावलेल्या खवय्यांना त्याचे मात्र सोयरसुतक नाही. बेडकांच्या मांसाला जम्पिंग चिकन म्हटले जात असून, गेल्या काही वर्षांपासून सासष्टी सारख्या भागात अनेक बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये त्याची विक्री होत आहे. एकीकडे पावसाळा सुरू झाल्यानंतर बेडूक पकडण्यासाठी शिकारी रात्री टॉर्च घेऊन वावरत आहेत, तर दुसरीकडे वन खात्यानेही आता या शिकाऱ्यांवर आपले पाश आवळण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री एका कारवाईत केपे तालुक्यातील पारोडा तसेच फातोर्डा येथील चंद्रवाडा येथे वन खात्याने कारवाई करताना पाच जणांना अटक करून सुमारे ६३ बेडकांची सुटका केली.दरवर्षी गोव्यात पावसाळ्यात बेडकांचा मोठ्या प्रमाणात संहार केला जातो. दोन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले आहे. रात्री टॉर्च घेऊन बेडके पकडण्यात येतात. बुधवारी वन खात्याने पारोडा येथील एका शेतात बेडके पकडणाऱ्या दोघांना अटक केली. फिदारीस रॉड्रिग्स (५१) व शेर्विन रॉड्रिग्स (२१) अशी उभयतांची नावे आहेत ते नात्याने पिता-पुत्र असून, दोन खुरीस येथील ते रहिवासी आहेत. त्यांच्याकडून १३ जिवंत बेडके जप्त करण्यात आली.वन खात्याच्या पथकाने चंद्रवाडा येथे एका कारवाईत नेविस बार्बोझा व एरिस्टन परेरा या दोघांना पकडून त्यांच्याकडून ५0 जिवंत बेडके जप्त केली. या कारवाईदरम्यान दोघांनी पळ काढला. मागाहून रात्री गुडी-पारोडा येथून ग्लेन फर्नांडिस याला अटक केली. सर्व संशयितांविरुध्द वन सरंक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केल्याची माहिती वन अधिकारी सिध्देश गावडे यांनी दिली.राज्यात बेडूक हा सामीश आहारला चटावलेल्या खवय्यांचा आवडीचा पदार्थ आहे. पहिल्या पावसानंतर दीर्घकालीन निद्रावस्थेतून बाहेर पडलेल्या बेडकांची मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते. बेडूक हा येथील जीवशृंखलेतील अतिमहत्त्वाचा दुवा आहे. त्याच्या अस्तित्वावर इतर अनेक प्रजातींचे जीवन अवलंबून आहे. बेडूक हे साप, पाखरांसारख्यांचे खाद्य आहे. बेडकांची पिल्लेही आपल्या परिसरातील वनस्पती जीवनावर प्रभाव टाकत असतात. म्हणूनच या प्रजातीचे जतन, संर्वधन पर्यावरण संतुलनाच्या दृष्टिकोनातून अगत्याचे आहे. मात्र, बेडकांच्या मांसाला चटावलेल्या लोकांना त्याचे काहीही पडून गेलेले नाही, दरवर्षी बेडकांची हत्या होते हेच सत्य आहे.ओळखीच्या ग्राहकालादेतात जम्पिंग चिकनसासष्टीत मोठ्या प्रमाणात बेडकांचे मांस खाल्ले जाते. येथील अनेक रॅस्टॉरंटमध्ये त्याची विक्री होते. मात्र, अशा रेस्टॉरंटवर कारवाई झाल्याचे कधी ऐकिवात नाही. अनेकदा रेस्टॉरंटवाले आपल्या ओळखीच्या गिऱ्हाईकांना हे मांस देतात, त्यामुळे कारवाई करणेही कठीण होऊन बसते, अशी माहिती एका वन अधिकाऱ्यांनी दिली.
सोस जम्पिंग चिकनचा : खवय्यांचे चोचले बेडकांच्या जीवावर
By admin | Updated: June 9, 2016 19:21 IST