कोल्हापूर : लोकनेते, माजी खासदार सदाशिवराव दादोबा मंडलिक (वय ८१) यांचे सोमवारी (दि. ९) मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. मुरगूड (ता. कागल) येथील जय शिवराय शिक्षण संस्थेच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी साश्रुपूर्ण नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला, तेव्हा मंडलिक यांची कर्मभूमी असलेला तो परिसरही काही क्षण गहिवरुन गेला.मंडलिक यांना गेल्या तीन-चार वर्षांपासून किडनीचा त्रास होता. तो जास्त झाल्याने गेल्या आठवड्यात त्यांना येथीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवड्यातून तीन वेळा त्यांचे डायलेसिस करण्यात येत होते. त्यामुळेही ते वैतागून गेले होते. प्रकृतीत फारशी सुधारणा होत नाही म्हणून सोमवारी सकाळीच त्यांना कारने मुंबईला खासगी रुग्णालयात हलविले. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव येथे आणण्यात आले. त्यांच्या कोल्हापूरातील रुईकर कॉलनीतील निवासस्थानी ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तिथे मंडलिक यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एकच गर्दी केली. अनेकांनी अश्रूंना वाट करून देत या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेतले. फुलांनी सजविलेल्या गाडीतून त्यांचे पार्थिव कागलला नेण्यात आले. तेथून ते हमीदवाडा साखर कारखान्याच्या परिसरात काही काळ ठेवण्यात आले व तेथून मुरगूडपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. सायंकाळी मुरगूड या त्यांच्या जन्म व कर्मभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.सदाशिवराव मंडलिक यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबातला. त्यांचे वडील ट्रॅक्टरचालक. आई गृहिणी. परंतु मंडलिक यांचा पिंड सुरुवातीपासूनच झगडण्याचा. अर्थशास्त्र विषय घेऊन ते राजाराम कॉलेजमधून १९५९ ला पदवीधर झाले. सुरुवातीपासूनच विद्यार्थी चळवळ, सीमाप्रश्न व गोवा मुक्ती आंदोलनातही ते सहभागी झाले. लोकल बोर्डाच्या राजकारणातून त्यांचे राजकीय जीवन सुरू झाले. चार वेळा आमदार, एकदा १९९३ ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, शिक्षणासह सहा खात्यांचे राज्यमंत्री, त्यानंतर पुढे सलग चार वेळा खासदार अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सतत चढती कमान राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर शरद पवार यांना भक्कम पाठिंबा देणाऱ्या मंडलिक यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पवार यांनी आपला अवमान केल्याच्या रागातून राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात शड्डू ठोकला व वयाच्या ७६ व्या वर्षी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून ते विजयी झाले. ही लढत ‘मंडलिक विरुद्ध पवार’ अशीच झाली होती. मंडलिक यांनी जनशक्तीच्या बळावर ती जिंकून दाखवून कोल्हापूर जिल्ह्णाच्या राजकारणातील आपणच खरा ‘ढाण्या वाघ’ असल्याचे महाराष्ट्राला दाखवून दिले. त्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा राज्यभरच नव्हे तर देशभर दबदबा झाला. परवाच्या २०१४ च्या निवडणुकीत मुलगा संजय याला काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले; परंतु ही जागाच पवार यांनी धूर्त राजकारण करून राष्ट्रवादीला मिळविली. म्हणून मंडलिक यांनी शिवसेनेशी संगत केली व मुलग्यास शिवसेनेतर्फे रिंगणात उतरविले; परंतु त्यांच्या या अखेरच्या राजकीय लढाईत त्यांच्या वाट्याला पराभव आला.मंडलिक यांचे मोठेपणमंडलिक नुसते राजकारणीच नव्हते. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून मोठे काम उभे केले. शेतकरी संघ, बिद्री साखर कारखाना, जिल्हा बँक, राज्य बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तालुक्यातील हमीदवाड्याच्या फोंड्या माळावर त्यांनी साखर कारखाना काढून तो उत्तम पद्धतीने चालवून दाखविला. ‘मोडेन पण वाकणार नाही’ असा त्यांचा बाणा होता. स्वच्छ चारित्र्य आणि सतत संघर्ष करीत राहणे हा त्यांचा स्वभाव होता; म्हणूनच ते इतकी प्रदीर्घ राजकीय कारकिर्द गाजवू शकले
सदाशिवराव मंडलिक अनंतात विलीन
By admin | Updated: March 10, 2015 23:06 IST