मुंबई : शिक्षणमंत्र्यांनी शाळांमध्ये केलेल्या पाहणीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे दप्तर त्यांच्या वजनापेक्षा अधिक असल्याचे पुन्हा समोर आले आहे. जून २0१६ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झालेले असेल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिली.विलेपार्ले पूर्वेकडील पार्ले टिळक विद्यालय आणि महानगरपालिकेच्या दीक्षित प्राथमिक मराठी शाळेला त्यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांचे दप्तर वजनकाट्यावर वजन करून तपासले. या पाहणीत दप्तराचे वजन सरासरी ४ ते ६ किलो इतके असल्याचे आढळले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचेही वजनकाट्यावर वजन करून पाहिले. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यास तज्ज्ञांची समिती गठीत केली आहे. दप्तराच्या ओझ्याविषयी आज केलेल्या पाहणीतील बाबी या समितीसमोर आपण मांडणार आहोत, असे तावडे यांनी या वेळी सांगितले.दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सर्व भाषा एकत्र आणि गणित, विज्ञान अशी विभागणी करता येईल का, शाळेत विविध विषयांच्या तासांचे जे वेळापत्रक आहे ते बदलता येऊ शकेल का, एकाच दिवशी विषयानुसार विभागणी करून जास्त वेळचे तास करता येतील का, पुस्तकांचे चाचणीनिहाय विभाजन, सर्व विषयांची तिमाही अभ्यासक्रमानुसार परीक्षा या बाबींचाही विचार करण्यात येईल, असेही ते या वेळी म्हणाले. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय करता येईल, याबाबत तावडे यांनी विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही सूचना केल्या. तीन सत्रांत परीक्षेची तपासणी राज्यात तामिळनाडूच्या धर्तीवर तीन सत्रांत परीक्षा आणि त्यानुसार अभ्यासक्रम आखणी करणे शक्य आहे का, हेही तपासले जाईल, असेही तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
येत्या वर्षापासून दप्तराचे ओझे कमी करणार
By admin | Updated: February 14, 2015 04:24 IST