मुंबई : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याच्या उद्देशाने टॅबची संकल्पना समोर आली. सध्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, प्रश्न-उत्तरे, मार्गदर्शन, डिक्शनरी यांचा समावेश आहे. लवकरच या टॅबमध्ये सुधारणा करून त्यात पावसाळ्यातील आजारांविषयी जनजागृती करणारे आणि आरोग्यविषयक काळजी व सूचनांचे सदर, शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान, हुतात्मा आणि क्रांतिकारकांची महती सांगणारे ‘वंदे मातरम्’ आदी सदरांचा अंतर्भाव करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. दिंडोशी येथे स्थानिक शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्यामार्फत सलग दुसऱ्या वर्षी खासगी शाळांतील ८०० विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले. दिंडोशीच्या विभाग क्रमांक -३ मधील टॅब वितरण आणि अन्य विकासकामांनिमित्त सुनील प्रभू यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तीकर, राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते. दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी व सेमी इंग्रजीच्या १० खासगी शाळांमधील इयत्ता ८वीच्या ८०० विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच गतवर्षी ज्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्यात आले होते, त्यांना ९वी आणि १०वीच्या अभ्यासक्रमाचे कार्ड देखील देण्यात आले. यावेळी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करणाऱ्या या टॅब संकल्पनेचे ख्यातनाम शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी देखील कौतुक केले आहे. सुनील प्रभू यांच्याप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधींनी टॅब वितरणाचा उपक्रम आपापल्या विभागात राबवल्यास उद्याच्या महाराष्ट्रासाठी ई-लर्निंग, ई-प्रबोधनाचे स्वप्न पूर्ण होईल. गेल्या २० महिन्यांत दिंडोशी विधानसभेत अनेक विकासकामे झाली असून, लवकरच कुरार भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होईल. दिंडोशीत अद्ययावत रुग्णालय आणि प्रसूतिगृह उपलब्ध करून दिले जाणार आहे. विभागप्रमुख आणि आमदार म्हणून १०० टक्के समाजकारण करण्याचा आपण प्रयत्न करीत असून, या विभागातून शिवसेनेचे २१ नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास सुनील प्रभू यांनी व्यक्त केला.
टॅबमधून देणार आरोग्यविषयक माहिती
By admin | Updated: July 18, 2016 02:12 IST