कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांचे सर्व मारेकरी पोलिसांना सापडले असून त्यांची नावे जाहीर करण्यास राज्य सरकार प्रतिबंध करत आहे, असा गौप्यस्फोट माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे केला. खऱ्या मारेकऱ्यांची नावे का जाहीर केली जात नाहीत, याचा जाब अधिवेशनात विचारणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. पानसरे यांच्या स्मारकाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला; त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या एसआयटीमधील एक अधिकाऱ्याने मला माहिती दिली आहे. मारेकरी सापडले आहेत; परंतु राज्य सरकार मारेकऱ्यांची नावे जाहीर करण्यास प्रतिबंध करत आहे. खुनी सापडले आहेत तर, त्यांची नावे जाहीर करून खुन्यांचा खरा चेहरा उघड करण्यास आम्ही भाग पाडू. असे ते म्हणाले.मुश्रीफ यांनी हा गौप्यस्फोट करताच कार्यक्रमस्थळी पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी ‘गोविंद पानसरे अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. खरे मारेकरी जोपर्यंत सापडणार नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार भाकपाचे नेते कॉ. कांगो यांनी केला.
पानसरेंचे मारेकरी पोलिसांना सापडले!
By admin | Updated: July 25, 2015 01:15 IST