मुंबई : अॅसिड हल्ल्यातील पीडितांना आता तीन लाखांऐवजी पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय आजच कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. आता खऱ्या अर्थाने समाजाने या पीडितांसोबत उभे राहण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. राज्य महिला आयोगाने अॅसिड पीडितांविषयी सर्वंकष धोरण तयार करावे, राज्य शासन या धोरणाला निधी, कायदा अशा सर्व स्वरूपांत मदत करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि ‘दिव्यज् फाऊंडेशन’ आयोजित ‘सक्षमा : कॉन्फिडन्स वॉक ’ हा कार्यक्रम वरळीतील ‘नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया’ येथे पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, अॅसिड हल्ला हा शरीरावर नसून त्या व्यक्तीच्या मनावरील हल्ला असतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीचे जगण्याचे बळ हरवून बसतात. मात्र याच प्रसंगात समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने वेळ, पैसा, सहभाग अशा कोणत्याही स्वरुपाचे योगदान देऊन त्यांची जगण्याची इच्छा प्रेरित केली पाहिजे. जेणेकरून, यातून या व्यक्ती पुन्हा एकदा सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील. अॅसिड हल्ल्यातील आरोपींच्या शिक्षेचे स्वरूप अधिक कठोर करण्यात येईल, त्यासाठी कायद्यातही आवश्यक तरतूद करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, महानगरपालिका आयुक्त अजय मेहता, महिला विकास व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे -पालवे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, अभिनेता विवेक आॅबेरॉय, दिग्दर्शक सुभाष घई, मेघना घई, अभिनेत्री सोनाली बेंद्रे या मान्यवरांनी दीपप्रज्वलन करण्यात आले. अमृता फडणवीस म्हणाल्या की, अॅसिड हल्ल्यातील पीडित हे ‘पीडित’ नसून आयुष्याच्या संघर्षात लढणारे खरेखुरे ‘योद्धे’ आहेत. त्यामुळे यांचे केवळ पुनर्वसन न करता त्यांना ‘सक्षम’ करणे हे आपले ध्येय आहे. याकरिता, समाजातील प्रत्येकाने योगदान देणे महत्त्वाचे आहे. या माध्यमातून ही सुरुवात झाली असून प्रत्येक घटकाचा पाठिंबा आवश्यक आहे. अॅसिड हल्ला कायद्यात महत्त्वाच्या दुरुस्ती करून त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे अशीही मागणी फडणवीस यांनी राज्य शासनाकडे केली. (प्रतिनिधी)>नोकरी, घर आणि बरचं काही..अभिनेता विवेक आॅबेरॉय याने आपल्या ‘कर्म’ या कंपनीच्या माध्यमातून ललिता या अॅसिड हल्ल्यातील पीडितेला आपल्या ‘प्रॉडक्शन हाऊस’मध्ये नोकरी दिल्याचे जाहीर केले. तसेच, ललिता सध्या भाड्याच्या घरात राहते; ललिताचा लहान भाऊ तिच्या काळजीसाठी सतत खूप धडपड करतो असतो. तरीही अशा परिस्थितीत ललिताची जगण्याची जिद्द लक्षात घेऊन विवेकने तिला हक्काचे घरही देत असल्याचे जाहीर केले. तसेच, या सोहळ्यात अॅसिड हल्ल्यातील आणखी दोन पीडितांना पोलीस दलात नोकरी मिळत असल्याचे सूत्रसंचालकांनी जाहीर केले.>‘कॉन्फिडन्स वॉक’ : या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘अॅसिड व्हिक्टर्स’सोबत ‘कॉन्फिडन्स वॉक’ केला. त्यात शब्बो-अभिनेत्री जुही चावला , चांदनी- पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर , अलिना- दिविजा आणि अमृता फडणवीस, रेश्मा शेख-अभिनेत्री साक्षी तन्वर, ललिता-अभिनेता विवेक आॅबेरॉय, मबिया-महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांचा समावेश होता.>‘अलग मेरा ये रंग है’ची गुंजअॅसिड हल्ल्यातील पीडितांसोबत चित्रित केलेल्या ‘म्युझिक व्हिडीओ’ यावेळी दाखवण्यात आला. अभिजीत जोशी लिखित ‘अलग मेरा ये रंग है’ हे गाणे स्वत: अमृता फडणवीस यांनी गायले आहे. या व्हिडीओचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे.>महिला विकास व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे-पालवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, ‘लोकमत’ वृत्त समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, अभिनेता विवेक ओबेरॉय, काकडे समूहाच्या उषा काकडे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
अॅसिड पीडितांना आता पाच लाखांची मदत
By admin | Updated: March 6, 2017 05:05 IST