- संतोष भिसे सांगली : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांत चारवेळा पदके मिळवलेली सांगलीची महिला कुस्तीपटू संजना बागडी सध्या उसाच्या शेतात राबत आहे. मैदाने बंद झाल्याने आर्थिक कोंडी झाली, त्यामुळे कुस्तीच्या मॅटवरून काळ्या रानात रोजंदारीवर घाम गाळावा लागत आहे. महिला कुस्ती क्षेत्रात संजनाने नाव कमवले. दिल्ली, पुणे, पाटणा, बेल्लारी येथील राष्ट्रीय स्पर्धांत पदके पटकावली आहेत. पण, कोरोनामुळे स्पर्धा रद्द झाल्या, गावोगावच्या यात्रा व मैदाने रद्द झाली, त्यामुळे आर्थिक स्रोत थांबला. स्पर्धेतील मानधन व बक्षिसांतून आहाराचा, सरावाचा खर्च निघायचा; तोच आता बंद झाला आहे.जिद्द : खर्च परवडेना तरीही सराव थांबला नाहीसांगलीजवळच्या तुंग (ता. मिरज) येथे संजना राहते. वडील खंडू कृष्णा नदीत मासेमारी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. बारावीत शिकणाऱ्या संजनाचा सराव आणि आहाराचा महिन्याचा खर्च ५० हजारांच्या घरात जातो. आता तिला पाच-सात हजारांतच भागवावे लागते. या स्थितीतही तिने सराव थांबविला नाही.मैदाने बंद असल्याने सराव आणि उत्पन्न दोन्ही थांबले आहे. खर्च चालविण्यासाठी शेतात घाम गाळण्याशिवाय पर्याय नव्हता. या निमित्ताने शारीरिक मेहनतही होते. - संजना बागडी, युवा महिला कुस्तीगीर
राष्ट्रीय कुस्तीपटू राबतेय राेजंदारीवर; मॅटवरून काळ्या मातीत; लॉकडाऊनमुळे झाली आर्थिक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 08:18 IST