कोल्हापूर : संगीत परंपरेचे मंदिर असलेला गायन समाज देवल क्लब, बालमजुरांना मुक्त करणारी ‘अवनि’ आणि मतिमंदांना स्वावलंबी बनवणारी ‘चेतना’ या संस्थांना आर्थिक सहकार्य करण्याची जबाबदारी अभिनेता नाना पाटेकर यांनी जाहीर केली आहे. यापूवीर्ही त्यांनी देवल क्लब आणि महापालिकेच्या शूटिंग रेंजला अर्थसाहाय्य केले आहे. मला मिळालेल्या भाकरीतला एक तुकडा या समाजाने दिला आहे, असा कृतज्ञ भाव ठेवत पाटेकर यांनी कोल्हापूरला आपल्या दानशूरतेची प्रचिती दिली आहे. कला, सांस्कृतिक आणि सामाजिक अशा विषयांना वाहून कार्य करणाऱ्या संस्था दानशूर व्यक्ती आणि लोकाश्रयावरच आपले कार्य नेटाने पुढे चालवीत असतात. नाना पाटेकर हे उत्तम कलाकार आहेतच; पण सामाजिक भान असलेले संवेदनशील माणूसही आहेत. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींवर ते थेट प्रहार करतात अशी त्यांची ख्याती आहे. या ख्यातीची प्रचिती देत त्यांनी काही वर्षांपूर्वी कोल्हापूर महापालिकेला शूटिंग रेंजसाठी टार्गेट रनरसाठी लाखाची मदत केली होती. कोल्हापुरात गानपरंपरा निर्माण करणारी आणि राजर्षी शाहू महाराजांचा आश्रय लाभलेली गायन समाज देवल क्लब ही संस्था म्हणजे शास्त्रीय संगीतासह वाद्य, नृत्याचे मंदिरच. या संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वषार्निमित्त आयोजित कार्यक्रमाला नाना पाटेकर यांना आमंत्रित केले होते. यावेळी पाटेकर यांनी संस्थेच्या नूतन वास्तूसाठी पाच लाखांचा निधी जाहीर केला आणि तो दिलादेखील. यातून संस्थेने आॅडिटोरिअम उभारले. निधीचा उल्लेख वास्तूवर कुठेही होऊ नये, अशीही इच्छा त्यांनी केली होती. त्यांनी वास्तूची पाहणीदेखील केल्याचे श्रीकांत डिग्रजकर यांनी सांगितले. काल, मंगळवारी ‘किफ’मध्ये झालेल्या एका समारंभात त्यांनी पुन्हा एकदा देवल क्लबला अर्थसाहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शिवाय ‘चेतना’ आणि ‘अवनि’चीही जबाबदारी स्वीकारली. त्यांचा हा निर्णय कोल्हापूरकरांचा सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवांवरील काजळी दूर करणारा ठरला आहे. (प्रतिनिधी)गायन समाज देवल क्लब राजर्षी शाहू महाराजांचा राजाश्रय लाभलेल्या देवल क्लबने शासनाच्या व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून नूतन वास्तू उभारली. या संस्थेत शास्त्रीय संगीताच्या मैफली, भरतनाट्य, कथ्थक नृत्याचे सादरीकरण, वाद्यांच्या सुरावटी अशी सांगीतिक चळवळ सुरू असते. मात्र या इमारती सुसज्ज झालेल्या नाहीत. वास्तूचे इंटिरिअर होणे बाकी आहे. रंगमंच, ध्वनिव्यवस्था, बैठक व्यवस्था, आलेल्या पाहुण्यांसाठी निवासाची सोय, कलादालन, लिफ्टची सोय या सगळ्या बाबींची पूर्तता होण्यासाठी आणखी दोन कोटींचा निधी लागणार आहे. चेतना विकास संस्था मतिमंद मुलांना समाजप्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या चेतना विकास संस्थेला जागेचा मोठा प्रश्न आहे. शेंडापार्कात आता जिथे संस्था चालवली जाते ती जागा संस्थेच्या नावावर नाही; त्यामुळे तेथे एक वीटही हलविता येत नाही; त्यामुळे या जागेच्या सातबारावर संस्थेची नोंद होणे आणि त्यानंतर इमारत बांधकाम, अद्ययावत सुविधा, उपकरणे, मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी काही उद्योग निर्माण करणे या दोन गोष्टींची संस्थेला गरज आहे. यासाठी लागणाऱ्या निधीचीही रक्कम १० कोटींच्या आसपास जाते. अवनि बालमजुरांना मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपडणाऱ्या ‘अवनि’ संस्थेच्या वतीने हणरबरवाडी येथे शाळाबाह्ण व बालकामगार मुलींसाठी निवासी संकुल उभारण्यात येणार आहे. संस्थेने यासाठी एक एकर जागा खरेदी आहे. मात्र, बांधकामासाठी पाच कोटींचा निधी लागणार आहे. येथे मुलींच्या राहण्यापासून ते शैक्षणिक सुविधांपर्यंतच्या सोयी तसेच बालगृह निर्माण करण्यात येणार आहे.
कला, सामाजिक चळवळीला नानांचाच आधार
By admin | Updated: December 25, 2014 00:55 IST