मुंबईः 'महाराष्ट्राचा मानबिंदू' असं बिरुद अभिमानानं मिरवणाऱ्या 'लोकमत' माध्यम समूहाची वेबसाईट - Lokmat.com वाचकसंख्येमध्ये पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे. एप्रिल महिन्यात तब्बल १ कोटी ४८ लाख ३२ हजार वाचकांनी (युनिक व्हिजिटर्स) 'लोकमत डॉट कॉम'ला भेट दिली आणि बातम्या, लेख, फोटोगॅलरी, वेब स्टोरीज् अशा विविध फॉरमॅटमधील मजकूर वाचला-पाहिला. या महिन्यात वेबसाईटवरील 'पेजव्ह्यूज'चा (वाचली गेलेली पाने) आकडा १५ कोटी २० लाखाहून अधिक आहे. ही वाचकांच्या प्रेमाची, त्यांच्या विश्वासाची पावतीच आहे. या जोरावरच अन्य स्पर्धक वेबसाईटना 'लोकमत'ने बरंच मागे टाकलं आहे. (Lokmat.com No. 1 Marathi News Website as per Comscore)
Comscore ही संस्था देशभरातील विविध भाषांमधील वेबसाईट्सचं मूल्यमापन करते. युजर्स/व्हिजिटर्स (वाचक), पेजव्ह्यूज (वाचकांनी वाचलेली पाने), व्हिजिट्स (वाचकांनी साईटला किती वेळा भेट दिली), मिनिट्स पर व्हिजिटर (प्रत्येक भेटीवेळी वाचक किती मिनिटं साईटवर थांबला), टोटल मिनिट्स (एकूण किती मिनिटं वेबसाईट वाचली गेली) अशा विविध निकषांच्या आधारे हे मूल्यमापन केलं जातं आणि प्रत्येक महिन्याचे आकडे जाहीर केले जातात. या संस्थेनं एप्रिल महिन्याचा डेटा नुकताच प्रसिद्ध केला असून त्यात 'लोकमत डॉट कॉम'ने पुन्हा एकदा खणखणीत बाजी मारली आहे.
सलग ४० महिने अव्वल स्थानी राहण्याचा आजवर कुणालाही न जमलेला विक्रम 'लोकमत डॉट कॉम'च्या नावावर असून आता नव्या वर्षांतही 'नंबर वन'चा सिलसिला कायम असल्याचं दिसतं. गेल्या काही वर्षांतील 'कॉमस्कोअर'ची आकडेवारी पाहता, 'लोकमत डॉट कॉम' ही देशातील प्रादेशिक भाषांमधील (हिंदी वगळून) सर्वाधिक वाचकसंख्या असलेली वेबसाईट ठरली आहे.
एप्रिल २०२५ मधील वाचकसंख्येचा विचार करता (युनिक व्हिजिटर्स) पहिल्या क्रमांकावर 'लोकमत डॉट कॉम' आहे, तर दुसऱ्या स्थानी ई-सकाळ. या दोघांमध्ये तब्बल २२ लाख युजर्सचं अंतर आहे. यातून 'लोकमत'ने वाचकसंख्येत केवढी मोठी आघाडी घेतली आहे, याचा सहज अंदाज येईल. एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
प्रत्येक वाचक सरासरी ७.३ मिनिटं 'लोकमत डॉट कॉम'वर थांबला. याचा अर्थ लोकमत ऑनलाइनवरील बातम्या, लेख त्याला वाचनीय, उपयुक्त, माहितीपूर्ण वाटले. एप्रिल महिन्यात १ कोटी ४८ लाख वाचकांनी 'लोकमत डॉट कॉम'ला भेट दिली आणि १० कोटी ९० लाख मिनिटं वेबसाईट वाचली गेली, असंही Comscore डेटामध्ये नमूद केलं आहे. स्पर्धकांपैकी कुणी या आकड्यांच्या आसपासही नाही.
'एक नंबरी' हॅटट्रिक
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या Comscore डेटामध्येही सर्वाधिक व्हिजिटर्स 'लोकमत डॉट कॉम'चे होते. फेब्रुवारी महिन्यात १ कोटी २५ लाख वाचकांसह, तर मार्चमध्ये १ कोटी ५३ लाख वाचकांसह लोकमत अव्वल स्थानी होती. एप्रिलमध्येही 'एक नंबरी' कामगिरी करत 'लोकमत'ने हॅटट्रिक नोंदवली आहे.
आमच्यासाठी वाचकच 'एक नंबर'
'लोकमत'च्या रिपोर्टर्सचं जाळं महाराष्ट्रभर विणलेलं असल्यामुळे राज्यातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड जलद गतीने, कुठलीही रंगवारंगवी आणि बनवाबनवी न करता, तटस्थ - निष्पक्षपातीपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यासोबतच, देशपातळीवरच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बातम्याही आम्ही विश्वासार्ह सूत्रांच्या हवाल्याने, पूर्ण खातरजमा करूनच देतो. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा-क्रिकेट या क्षेत्रांतील बातम्यांसोबत अभ्यासपूर्ण लेख, परखड विश्लेषणं, पडद्यामागच्या घडामोडी सांगणारी सदरंही 'लोकमत डॉट कॉम'वर असतात. त्याशिवाय, लोकमत सखी, लोकमत फिल्मी, लोकमत भक्ती, लोकमत मनी, लोकमत ॲग्रो या मायक्रोसाईट्स त्या-त्या विशिष्ट विषयांना वाहिलेल्या आहेत. वाचकांची रुची-अभिरुची ओळखून, त्यांना केंद्रस्थानी ठेवून 'लोकमत डॉट कॉम' काम करतंय. सलग तीन महिने अव्वल स्थानी राहणं ही त्यांच्या विश्वासाची मोहोरच आहे.