संजय सुर्वे- शिरगाव आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर रत्नागिरी जिल्ह्यातील कबड्डीपटूंची कामगिरी सामान्य जनतेला पाहायला मिळत नव्हती. मात्र, प्रो कबड्डीने अवघ्या देशात हा खेळ लोकप्रिय बनला. रत्नागिरी जिल्ह्याचे चार सुपुत्र दूरचित्रवाहिन्यांवर चमकले. मात्र, उद्योग क्षेत्राने खेळाडूंकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कोकणात गावागावात विविध कार्यक्रमांचे औचित्याने कबड्डी स्पर्धा होतच असतात. लाखो रुपयांची उलाढाल यात होत असते. या खेळाइतके प्रेम आणि क्रीडा रसिक कोकणात अन्य खेळाला मिळालेले नाही, हे वास्तव आहे. तरीही प्रत्यक्ष खेळाडूंंच्या करिअरकडे तळमळीने व गांभीर्याने कोणीच पाहात नाही. कोणत्याही खर्चाशिवाय खेळला जाणाऱ्या खेळात चपळ, कोकणी तरुण बालपणापासून पुढे येतो. मात्र, शिकताना मंडळातून खेळत मोठा झालेला खेळाडू ज्यावेळी उद्योग व्यवसायाकडे जातो तिथे त्याचा कोणताच सन्मान होत नाही, किंबहुना जिल्ह्यात पोषक वातावरण नाही. प्रत्येक खेळाडूच्या प्रगतीमागे त्याला नोकरी, उद्योग अत्यावश्यक असतो. मात्र, खूप विनंती करुन त्यांना कंत्राटी कामगार म्हणून ठेवले जात आहे. चिपळूणच्या गुरुकुल व मंडणगडच्या नम्रता प्रतिष्ठानने खेळाडूंना आर्थिक मदतीचा हात पुढे करत किंबहुना स्वावलंबी बनवण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. याखेरीज अनेक भागात खेळणारे मंडळाचे गुणी खेळाडू केवळ कबड्डीच्या प्रेमापोटी आणि रसिकांच्या टाळ्यांवर आनंदी होत वर्षानुवर्ष खेळतात.खेळातील कौशल्य दिसताच प्रचंड कौतुक होते. मात्र, त्यांचे भविष्य मात्र तिथे घडेलच, अशी शक्यता नाही. तरीही जिद्दी खेळाडू खेळतच राहतात. खेळाडूंना अंगावर न घेण्याची भूमिका ठेवणारे उद्योग संयोजकाना मात्र, आर्थिक बळ देतात, असे दिसून येते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, रायगड अशा ठिकाणी विविध कंपन्या खेळाडूंच्या खेळासोबत क्रीडा विकासाला चालना देत स्वतंत्र संघ खेळवत राहाणे प्रतिष्ठेचे मानतात. सर्वाधिक गुणी खेळाडू देणाऱ्या जिल्ह्यात मात्र कोणतीही बँक, कंपन्या प्रत्यक्ष खेळाडूच्या जीवनाला दिशा देण्यासाठी त्यांना नोकरी देत नाहीत. कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अनेक कंपन्यानी संघ पाठवावा, अशी अपेक्षा असताना जिल्ह्यातून एखादाच संघ तिथे पोहोचतो ही वस्तुस्थिती आहे. निमंत्रितांच्या राज्य स्पर्धेत नामवंत कंपन्यांचे बनियन घातलेले मजबूत खेळाडू पाहून ग्रामीण भागातील खेळाडू पुढे येत नाहीत. पण, त्यांना संधी मिळण्यास पाच पाच वर्षे वाट पाहावी लागते.नोकरी पाहिजे नोकरी...जिल्ह्यातील उद्योगांची खेळाडूंकडे पाठ.कबड्डीपटूंना कंपनीत नोकऱ्या हव्या.कंपन्यांचे संघ दुर्मीळ.केवळ कबड्डीप्रेमापोटी अनेकांचा रोजचा खेळ.स्पर्धा संयोजकांना पाठबळ.नम्रता प्रतिष्ठानने खेळाडूंना दिला आर्थिक हात.
कबड्डी झाली मोठी खेळाडूंचा खो-खो?
By admin | Updated: November 12, 2014 22:50 IST