पुणे : मागायवर्गीय विद्यार्थ्यांकडून सध्या बेकायदा शुल्क वसुली सुरू आहे किंवा नाही, याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाने मागविली आहे. येत्या १८ जून रोजी ही माहिती याचिकाकर्त्यांनी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. भारतीय क्रांतीकारी संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थशंकर शर्मा यांनी २०१२ मध्ये याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याबाबत नुकतीच सुनावणी झाली. ही याचिका दोन वर्षांपुर्वी दाखल केली असल्याने याबाबतची सद्यस्थिती म्हणजे संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना शुल्क परत देण्यात आली आहे किंवा नाही तसेच विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्क वसूल कसे होते हे दाखविण्यासाठी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. त्यावर येत्या १८ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.याविषयी माहिती देताना शर्मा म्हणाले, या आदेशाचे महत्व म्हणजे सन २०१३ व २०१४ साली ज्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा बेकायदा शुल्क घेण्यात आले, त्याची माहिती उच्च न्यायालयात दाखल करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आधी समाजकल्याण खातेकडून देण्यात आलेल्या आदेशांची अंमलबजावणी जी अद्याप झालेली नाही त्याबाबत उच्च न्यायालयास माहिती देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर शुल्क घेण्यात आले आहे, त्यांनी याची माहिती द्यावी, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे.
बेकायदा शुल्कवसुलीबाबत मागविली माहिती
By admin | Updated: May 9, 2014 22:27 IST