पिंपळे गुरव : नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून पदपथ बनविले आहेत. मात्र, सांगवी, नवी सांगवी व पिंपळे गुरव येथील प्रमुख रस्त्यावर उखडलेले पदपथ, पडलेला राडारोडा, उघडे चेंबर आदींचे साम्राज्य असल्यामुळे नागरिकांनी चालायचे कोठून हा प्रश्न निर्माण झाला आहे. पदपथ असून, अडचण नसून खोळंबा या म्हणीप्रमाणे परिस्थिती बनली आहे. त्यामुळे शाळकरी मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रमुख रस्त्यावरून चालावे लागत आहे. जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, सुदर्शननगर व दापोडी परिसरातील प्रमुख रस्त्यावर रहिवाशांना सहजगत्या ये-जा करण्यासाठी पदपथ तयार करण्यात आले. यासाठी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र या पदपथावर पादचाऱ्यांचा हक्क न राहता, खासगी व्यावसायिक, उद्योजकांसह ठेकेदार यांच्यासाठी जणू आपला सातबारा कोरलाच आहे. या पदपथांचा वापर वाहनतळ, बांधकामाचे साहित्य, दुकानाचे फलक व विक्रीसाठी असलेले साहित्य ठेवण्यासाठी उपयोग होत आहे. या पदपथावर नागरिकांना चालता येत नाही. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी रस्ता वाहनांच्या गर्दीने तुडुंब भरला जातो. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना आपल्या हक्काच्या पदपथांवरून चालणेही कठीण बनले आहे. ठेकेदार मात्र आपल्या कामासाठी वाटेल तेव्हा खोदकाम करुन ठेवतात. भूमिगत गॅसवाहिनीच्या कामासाठी पाच महिन्यांपासून परिसरातील प्रमुख रस्त्यावर खोदकाम करून ठेवले आहे. बहुतांश ठिकाणी गॅसवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पदपथांची व रस्त्याची दुर्दशा जैसे थे आहे. या भूमिगत गॅसवाहिनीच्या कामासाठी ठेकेदाराला किती कालावधी दिला होता, त्या कालावधीत काम पूर्ण का झाले नाही, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. जुनी सांगवीतील शितोळेनगर चौक, नवी सांगवीतील साई मिनी मार्केट, कृष्णा चौक, पिंपळे गुरव येथील एमएस काटे चौक, काटेपुरम चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, नवीन ६० फुटी रस्ता, सुदर्शननगर येथील सृष्टी चौक आदी ठिकाणच्या पदपथावर ठेकेदाराने खोदकाम करून ठेवल्यामुळे पादचाऱ्यांना वर्दळीच्या मार्गावरून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. सांगवी, पिंपळे गुरवमधील मुख्य रस्त्यावर राडारोडा पडला आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकांसह शाळकरी मुलांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागते. रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. (वार्ताहर)>मी परिसरातील पदपथांची पाहणी करून दुरवस्था झालेल्या पदपथांच्या दुरुस्तीसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच संबंधित भूमिगत गॅसवाहिनीच्या कामासाठी महापालिकेने कंत्राटदाराला किती महिन्यांचा कालावधी दिला होता. त्या कालावधीत भूमिगत गॅसवाहिनीचे काम पूर्ण झाले असले, तरी खोदकाम केलेल्या रस्त्यांची व पदपथांची दुरुस्ती का झाली नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई का करण्यात आली नाही आदीबाबत विचारणा करणार आहे. - राजेंद्र जगताप, नगरसेवक>एकतर काम मिळेल की नाही ही मोठी चिंता असते. सकाळच्या वेळी घरातील कामे आवरून कामावर जाण्याची घाई, त्यामध्ये रस्ता पार करण्याची मोठी कसरत क रावी लागते. या कसरतीमध्ये मजुरांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. प्रमुख रस्त्याने वाहने भरधाव वेगाने धावतात. अनेक वेळा रस्त्यावर अपघात झाले आहेत. यासाठी प्रशासनाने नागरिकांसाठी योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे गरजेचे आहे. - राजू सावळे, शहर सचिव, मनसे >महापालिकेच्या प्रशासनाकडून या खोदकामाकडे दुर्लक्ष होत आहे. ठेकेदार रस्त्यावर खोदकाम करत असताना असताना स्थानिक रहिवासी पदपथावरून ये-जा करतात. या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. चार पैसे मिळवण्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचे काम ठेकेदारांनी करू नये. आपल्या खोदकामाचा त्रास इतरांना होणार नाही, या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. - किसन फसके, सामाजिक कार्यकर्ते
पदपथावरून चालायचे सांगा कसे?
By admin | Updated: August 1, 2016 01:58 IST