मुंबई : राज्यात येणाऱ्या बनावट मद्यावर प्रतिबंध घालण्यासाठी विभागाने होलोग्राम बसविण्याचा निर्णय महिनाभरात घ्यावा, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी दिले.विधान भवनच्या प्रांगणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ४४ नव्या वाहनांच्या वाटपाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खडसे बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रधान सचिव राजेशकुमार मीना, आयुक्त श्यामसुंदर शिंदे या वेळी उपस्थित होते.खडसे म्हणाले, की गेल्या वर्षी ११ हजार ४०० कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करणारा राज्य उत्पादन विभाग तिसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. त्याची कार्यक्षमता अधिक वाढून राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विभागाला क्षेत्रीय सत्रावर अधिक काम करता यावे, यासाठी ४४ नवीन वाहने देण्यात आली आहेत. पुढील वर्षी देखील अजून ५० वाहने खरेदी करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही खडसे यांनी दिल्या.विभागाच्या सक्षमीकरणावर भर देतानाच मुंबई येथे एक्साइज भवन व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्याचे येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येईल, असे खडसे म्हणाले. महसुलात पुढल्या वर्षी २० हजार कोटी रुपयांची भर घालण्याचा मानस असल्याचे सांगून ते म्हणाले, की अन्य राज्यातून बनावट मद्य मोठ्या प्रमाणावर येते. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी महिनाभरात होलोग्राम लावण्याचा निर्णय घेण्यात यावा, परराज्यातून बनावट मद्य येता कामा नये. विभागातील रिक्त पदे भरण्याची मोहीम त्वरित हाती घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
बनावट मद्याच्या प्रतिबंधासाठी होलोग्राम
By admin | Updated: May 14, 2015 02:17 IST