अहमदनगर : नवनिर्मित तेलंगण राज्यात पावसाअभावी निर्माण झालेली स्थिती व पंचायत राजचे बळकटीकरण करण्याचे आव्हान पेलण्यासाठी हिवरेबाजार मॉडेलची मदत घेतली जाणार आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के . चंद्रशेखर राव व आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची बैठक झाली आहे. तेलंगणमधील गावागावांत हिवरेबाजार मॉडेल राबविण्याचा निर्णय चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत तेलंगणच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. हिवरेबाजार गावाने राज्यात नव्हे, तर देशपातळीवर पाणलोट विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत ठसा उमटविला आहे. ग्रामीण विकासासाठी चंद्रशेखर राव यांचा हिवरेबाजारच्या धर्तीवर काम करण्याचा मानस आहे. हिवरेबाजारमध्ये शेतीच्या पाण्याचे नियोजन, शैक्षणिक गुणवत्ता विकास, ग्रामसभेचा निर्णय सर्वांना बंधनकारक, गावातील वाद गावात मिटविणे यावर भर देण्यात येतो. नशाबंदी, नसबंदी, पाण्याचा ताळेबंद, बोअरबंदी, चराईबंदी आणि शौचालयांची निर्मिती, श्रमदान या सप्तसूत्रीचा अवलंब करण्यात येतो. शासकीय योजनांसाठीच्या निधीतून दर महिन्याला झालेल्या खर्चाचा तपशील जनतेला देण्यात येतो. पाऊस पडण्यापूर्वी, भूगर्भात पाणी मुरविण्यापूर्वी उपलब्ध पाण्याचा ताळेबंद देण्यात येत असून, शेतकरी जादा पाण्याची पिके टाळतात. तेलंगणमध्ये जिल्हा, तालुका आणि गावनिहाय नियोजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
हिवरेबाजार मॉडेल तेलंगणच्या गावागावात पोहचणार
By admin | Updated: July 16, 2014 03:01 IST