मुंबई : दुष्काळी भागांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले असून, त्यांनी शुक्रवारी मराठवाड्यासह अहमदनगर, नाशिक आणि जळगावमधील काही भागांना भेट दिली. तेथे पथकाला शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. बीड तसेच जळगावमध्ये त्यांना घेरावही घालण्यात आला.मराठवाड्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकांनी शुक्रवारी दोन दिवसीय पाहणीस प्रारंभ केला. विशेष म्हणजे, दौऱ्यातील पाहणीची ठिकाणे निश्चित नव्हती. अधिकाऱ्यांना वाटले तेथे थांबून त्यांनी पाहणी केली. या पथकात केंद्रीय कृषी मंत्रालयाचे आयुक्त डॉ. एस.के. मल्होत्रा, केंद्रीय कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. आर.पी. सिंग, केंद्रीय पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. एच.आर. खन्ना, राज्याचे अपर मुख्य सचिव (कृषी) डी.के. जैन, राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुहास दिवसे आदींची उपस्थिती होती.मात्र या दौऱ्यादरम्यान शेतकरी आक्रमक झाले होते. मागच्या रब्बीचा पीक विमा अजून मिळाला नाही. लागवडीचा खर्चही निघेना. मुलींचे शिक्षण, लग्न करायचे तरी कसे? खासगी तसेच बँकांची कर्जे फेडावी कशी? रब्बीचे पीकही हातचे गेले, पिण्यास पाणी, जनावरांना चारा केव्हा देणार, यांसारखे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले.बीडमध्ये पथकास घेरावदुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी वर्षभरात तिसऱ्यांदा आलेल्या केंद्रीय पथकाच्या गाडीला कोळगाव येथे घेराव घालत ‘पाहणी करण्यासाठी तीन-तीनवेळा येता आणि मदतीचा पत्ता नाही. आम्हाला मदत करा नाहीतर गोळ्या घालून मारा,’ असे म्हणत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)नगरमध्ये धावता दौरादुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दुसऱ्यांदा केंद्रीय पथक नगरमध्ये दाखल झाले आहे़ या पथकाने केलवड (ता़ राहाता), नान्नज दुमाला (ता़ संगमनेर) या गावांची पाहणी केली़ आता ते शनिवारी दक्षिण नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघणार आहे़ या पथकात नीति आयोगाचे उपसल्लागार मानस चौधरी आणि ऊर्जा मंत्रालयाच्या वीज प्राधिकरणाचे उपसचिव संतनू बिश्वास यांचा समावेश आहे.नाशिकमध्ये पाहणीचा ‘सोपस्कार’केंद्रीय पथकाच्या सदस्यांचा नाशिक जिल्ह्याच्या पाहणीचा ‘सोपस्कार’ शुक्रवारी पार पडला. तीन तालुक्यांच्या टंचाईग्रस्त गावांची समितीतील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्याचा अहवाल केंद्राला सादर करणार असल्याचे सदस्यांनी जाहीर केले असले तरी त्यांच्या विविध शंकांचे निरसन करताना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र होते. हे पथक सायंकाळी सिन्नर तालुक्यात दाखल झाले. तालुक्यातील दोडी खुर्द गावात पोहोचेपर्यंत अंधार झाल्याने पथकाने अंधारातच पाहणी केली.
जळगावातही आक्रमक केंद्रीय पथकातील सदस्य व नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. कैलास मोते यांना शेलवड ता. बोदवड येथील शेतकऱ्यांनी घेराव घातला आणि शेतात दाणा उगवला नसताना तुम्ही ४९ पैसे आणेवारी कशी लावली, असा जाब विचारला. अचानक झालेल्या या प्रकाराने अधिकारी वर्ग आवक झाला. आम्हाला पिण्याचे पाणीही वेळेवर मिळत नसल्याची व्यथा या शेतकऱ्यांनी महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे मांडली. त्यानंतर हे पथक जामनेरकडे मार्गस्थ झाले.