कोल्हापूर : गोविंद पानसरेंवरील भ्याड हल्ल्याला चार दिवस उलटल्यानंतरही हल्लेखोर किंवा त्यांच्याबाबतचे ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत. राज्य सरकार व पोलीस यंत्रणा तपासात अपयशी ठरव्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे केली. सरकार आता नवे राहिलेले नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत येत्या अधिवेशनात त्यांना धारेवर धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पवार यांनी अॅस्टर आधार हॉस्पिटलला भेट देऊन ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री जयंत पाटील व हसन मुश्रीफ त्यांच्यासोबत होते. सरकार कोणाचेही असू दे पण, राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली पाहिजे. आपले विचार ठामपणे मांडणाऱ्या पानसरेंवरील हल्ला महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर हल्ला आहे. नरेंद्र दाभोलकर व पानसरे यांच्यावरील हल्ल्यांत साम्य असल्याचे सध्यातरी दिसते. केंद्र आणि राज्यात जो सत्ताबदल झाला. त्यानंतर हिंदुत्वाच्या नावाखाली काही गोष्टी होत आहेत. त्याचा शोध सरकारने घेतला पाहिजे. या भ्याड हल्ल्यामागे जात्यंध शक्ती आहेत का? हे पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तपासात सरकार अपयशी
By admin | Updated: February 20, 2015 01:04 IST