पदवीधरसाठी उमेदवार : भाजपाध्यक्षांनी दिली मान्यता
नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी आपली गादी महापौर अनिल सोले यांना सोपविली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार याची उत्सुकता लागली होती. निवडणुकीची तारीख जाहीर झाली तरी उमेदवारीचा मुहूर्तच निघत नव्हता. शेवटी प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी आज सोले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. १९८९, १९९६, २००२ व २००८ अशा चारही निवडणुकांमध्ये नितीन गडकरी यांनी या मतदारसंघात बाजी मारली. या वेळी गडकरी यांनी नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढवित एकतर्फी विजय नोंदविला. त्यामुळे आता या मतदारसंघाचे नेतृत्व गडकरी कुणाकडे सोपवितात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महापौर अनिल सोले, भाजपचे नागपूर शहर महामंत्री संदीप जोशी, संजय भेंडे, माजी आमदार अशोक मानकर यांची नावे चर्चेत होती. सोले व जोशी यांच्यात उमेदवारीसाठी शेवटपर्यंत रस्सीखेच झाली. दोघांचेही समर्थक आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळेल, असा दावा करीत होते. अशातच बुधवारी सोले यांनी दिल्ली गाठली. तेव्हाच त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे संकेत मिळाले होते. शेवटी आज उमेदवारी जाहीर करण्यात आली. महापौर सोले यांनी भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष, महापालिकेत सत्तापक्ष नेते आदी पदांवर काम केले आहे. प्राध्यापक म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. आता त्यांची टक्कर काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे यांच्याशी होणार आहे. तायवाडे यांनी सहा महिन्यांपूर्वीच व्यक्तिगत पातळीवर कामाला सुरुवात केली होती तर, निवडणुकीला २८ दिवस बाकी असताना सोले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. कमी काळात सहा जिल्ह्यात विखुरलेल्या मतदारापर्यंत पोहचण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. (प्रतिनिधी) गडकरींची गादी कायम राखू- सोले ंराष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांची पदवीधरची जागा सोपवून पक्षाने माझ्यावर विश्वास दाखविला आहे. या विश्वासाला आपण धक्का लागू देणार नाही. पक्षसंघटना, कार्यकर्ते व वैयक्तिक संबंधाच्या भरवशावर आपण काँग्रेस उमेदवाराला टक्कर देऊ आणि गडकरींची गादी कायम राखू, असा विश्वास सोले यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला.