मुंबई : संमेलन आणि वाद हे समीकरण साहित्यविश्वाला नवे नाही, असे काहीसे चित्र पुन्हा एकदा साहित्य वर्तुळात पाहायला मिळते आहे. नुकतेच अखिल भारतीय साहित्य महामंडळाने साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान येथे होणार असल्याचे जाहीर केले. मात्र साहित्य संमेलनाच्या या स्थळाबाबत प्रकाशकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. तर काही प्रकाशकांनी व्यावसायिक दृष्टीपलीकडे जाऊन वाचन चळवळीचा विचार व्हावा, असे मत व्यक्त केले आहे.संमेलनाच्या ठिकाणी मराठी भाषकांचे वास्तव्य नसल्याने ग्रंथविक्री होणार नाही, असे प्रकाशकांचे म्हणणे आहे. साहित्य संमेलनाच्या काळात सर्वाधिक ग्रंथविक्री होते. त्या तुलेनत इतर ठिकाणच्या प्रदर्शन वा कार्यक्रमात पुस्तक विक्री होत नसल्याने प्रकाशकही संमेलन आणि त्यातील ग्रंथप्रदर्शनासाठी उत्सुक असतात. ‘संमेलन अखिल भारतीय असल्याने ते भारतभरात कोठेही होऊ शकते हे मान्य आहे; पण जानेवारीपासून ग्रंथ व्यवसायाची काय परिस्थिती आहे याची महामंडळाला कल्पना असतानाही असा निर्णय घेतला जाणे अनाकलनीय आहे. घुमान ही संत नामदेवांची भूमी असली, तरी त्या ठिकाणी मराठी लोकांचे वास्तव्य नाही. अमृतसर, लुधियाना, दिल्लीतून संमेलनाला किती मराठी लोक येणार हे सांगता येत नाही. त्यामुळे संमेलनात पुस्तकविक्रीची काहीही शाश्वती नाही,’ असेही मत एका प्रकाशकाने व्यक्त केले. (प्रतिनिधी)
‘घुमान’वरून घुमतोय वाद !
By admin | Updated: July 4, 2014 06:23 IST