मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला जे. जे. इस्पितळातून सुटी देण्यात आल्याने तिची पुन्हा तुंरूगात रवानगी करण्यात येणार आहे. तथापि, यावेळी तिला अधिक सुरक्षित असलेल्या बराकीत ठेवण्यात येणार असून तिच्या हालचालीवर चोवीस तास बारकाईने नजर ठेवली जाईल, असे तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले. तिची प्रकृती कशी आहे, ते पाहूनच तिचा जबाब नोंदविला जाईल, असे बी. के. सिंग यांनी सांगितले. तथापि, आम्हांला या प्रकरणी सरकारला अंतिम अहवाल सादर करण्याची कसलीही घाई नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.मागच्या आठवठ्यात बेशुद्ध होण्याआधी तिला भायखळास्थित महिला तुरुंगातील पहिल्या मजल्यावर ५ आणि ६ व्या क्रमांकाच्या बराकीत ठेवण्यात आले होते. आता तिच्या बराकीत मोजकेच कैदी असतील. तुरुंग कर्मचारी तिच्या हालचालींवर २४ तास बारकाईने लक्ष ठेवणार आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.इस्पितळातून सुटी देताना इंद्राणीची तब्येत ठीक असल्याचे प्रमाणपत्र जे. जे. इस्पितळाने दिले आहे. जे. जे. इस्पितळात बेशुद्धावस्थेत दाखल करण्याआधी इंद्राणी तुरुंगात कोसळली होती. तिच्या आईचे निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर ती कोसळली का? तिच्या आईच्या निधनाची बातमी तुरूंग कर्मचाऱ्यांनी कळविलेली नव्हती. वृत्तपत्रातून तिला ही बातमी कळाली असावी. तथापि, हे सर्व पैलू विचारात घेऊन आम्ही तुरूंगात त्या दिवशी घडलेल्या प्रकाराची चौकशी करणार आहोत. त्यासाठी तिचा जबाब यादृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच आम्ही आणखी काही अहवालाची वाट पाहत आहोत, असेही सिंग यांनी सांगितले.
इंद्राणीच्या हालचालीवर ठेवणार बारीक नजर
By admin | Updated: October 7, 2015 02:33 IST