प्रगणनेत दर्शन दुर्लभ : पक्षिप्रेमींची घोर निराशा नागपूर : शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘माळढोक’ पक्ष्याचे जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून दर्शन दुर्लभ झाले आहे, त्यामुळे तो जिल्ह्यातून नामशेष तर झाला नाही ना? अशी पक्षिप्रेमी भीती व्यक्त करू लागले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्यावतीने या दुर्मिळ पक्ष्याच्या संवर्धनासाठी वन विभागाच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून वन विभागाच्या माध्यमातून दरवर्षी या पक्ष्याची प्रगणना केली जाते. त्यानुसार वन विभागाने गत ११ ते १३ जूनदरम्यान सेमिनरी हिल्स वन परिक्षेत्रासह बुटीबोरी, रामटेक, उत्तर उमरेड व दक्षिण उमरेड अशा पाच ठिकाणी प्रगणना कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु सोमवारी वन विभागाला तो प्रगणना अहवाल प्राप्त झाला असून, त्यात जिल्ह्यात एकाही माळढोक पक्षी आढळून आला नसल्याची माहिती वन विभागाचे सहायक वनसंरक्षक आर. डी. चोपकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. यामुळे पक्षिप्रेमींची निश्चितच फार मोठी निराशा झाली आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या प्रगणना कार्यक्रमातसुद्धा तो आढळून आला नव्हता. राज्य सरकारने या पक्ष्याच्या संवर्धनासाठी गत वर्षभरापूर्वी वन विभागाला ‘संवर्धन आराखडा’ तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नागपूर वन विभागाने आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविला असल्याची माहिती आहे. त्याला सरकारकडून मंजुरी मिळताच या पक्ष्याच्या संवर्धन कामाला गती मिळू शकते, शिवाय शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून विशेष उपक्रमसुद्घा राबविले जातील. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे माळढोकच्या संवर्धनासाठी असाच विशेष उपक्रम राबविला जात आहे. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पावसाळ्यात शेतकऱ्याच्या हिरव्यागार शेतात हमखास दिसून येतो, शिवाय तो पिकाला कोणतेही नुकसान न करता पिकावरील अळ्या व किडे खातो. त्यामुळेच त्याला शेतकऱ्यांचा ‘मित्र’ म्हणून ओळखल्या जाते. ज्येष्ठ पक्षिप्रेमी गोपाल ठोसर या पक्ष्याच्या संवर्धनासाठी गत अनेक वर्षांपासून झटत आहेत. वरोरा परिसरात आढळून येत असलेले माळढोक त्यांच्या या प्रयत्नाचे फलित असल्याचे मानल्या जाते. त्यांनी यंदाही वन विभागाच्या प्रगणाना कार्यक्रमापूर्वी उमरेड येथे एक कार्यशाळा घेऊन वन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. (प्रतिनिधी)
माळढोक जिल्ह्यातून नामशेष!
By admin | Updated: July 15, 2014 01:11 IST