सातारा : ज्या वयात भविष्याचा पाया रचायचा, अभ्यास करून मोठ्ठं होण्याची स्वप्नं रंगवायची, त्या वयात काही लहानग्यांचे पाय लडखडू लागलेत. नशेचा राक्षस लहानग्यांना कवेत घेऊन त्यांच्या स्वप्नांचे इमले उद््ध्वस्त करू पाहतोय. सर्वांत भीषण बाब म्हणजे, पैशांच्या हव्यासापुढे नीतिमत्ता कवडीमोल ठरू लागली असून, नशेचे व्यापारी लहानग्यांच्या हाती मागेल ती बाटली ठेवत आहेत. या वस्तुस्थितीचा पर्दाफाश करण्यासाठी काही लहानगेच ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये निडरपणे सहभागी झाले, हे विशेष! वय वर्षे आठ ते सोळा. ‘ब्रॅण्ड’ सांगितला तर तो लक्षात राहत नाही. काहींना तर हे दारूचे नाव आहे की औषधाचे, हेही माहीत नाही. अशा लहानग्यांनी आणि त्यांच्या पालकांनी ‘लोकमत’च्या या विषेश मोहिमेला भरभरून सहकार्य केलं. मुलं बेधडक घुसली देशी-विदेशी दारूच्या दुकानांत. सांगितलं ‘ब्रॅण्ड’चं नाव. अनेक ठिकाणी पैसे देताच काउंटरच्या पलीकडून आवाज आला, ‘नीट खिशात ठेव बाबा.’ मनात भीती असली तरी धपापत्या छातीनं या लहानग्यांनी धाडस केलं ते आपल्यासारख्याच काही छोट्या दोस्तांसाठी. शनिवारी (दि. २१) तांदूळ आळीमध्ये आठ-दहा वर्षांची चार मुलं चक्क कोंडाळं करून दारू प्यायला बसली होती... अगदी शेंगदाणे-फुटाणे सोबत घेऊन. त्यातल्या दोन मुलांना उलट्याही झाल्या. काही नागरिकांनी या मुलांना पकडलं आणि नावागावाची विचारपूस केली. मात्र, मुलांनी प्रथम ताकास तूर लागू दिला नाही. अखेर पोलिसांची भीती घातल्यावर त्यांनी नावं सांगितली. शिक्षा म्हणून नागरिकांनी या मुलांचं मुंडन केलं. परंतु मुख्य मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे, इतक्या लहान मुलांना दारू विकत दिली कुणी? याबाबत काही नियम, कायदेकानू आहेत की नाही? म्हणूनच ‘लोकमत’ने याबाबतीत स्टिंग आॅपरेशन करण्याचं ठरवलं. लहान मुलांना दारू दुकानाच्या काउंटरवर पाठवणं, हीच मोठी कसरत होती. परंतु असीफ शेख, संतोष शिंदे, आकाश भोसले, मयूर पाटील ही आठ ते सोळा वयोगटातली मुलं या कामासाठी तयार झाली. त्यांनी मोठी जोखीम पत्करून दुकानांमध्ये दारूची मागणी केली. एखादा अपवाद वगळता अन्यत्र त्यांना दारू देण्यात आली. त्यांच्या पालकांनीही मुलांना तशी परवानगी देऊन ‘लोकमत’ला सहकार्य केलं; म्हणूनच एक विदारक वास्तव नागरिकांसमोर येऊ शकलं. (प्रतिनिधी)‘त्यानं’ विचारलं, ‘काय पाहिजे?’पोराचं वय अवघं नऊ वर्षांचं. बराच वेळ पोरगं कर्मवीर पथावरील देशी-विदेशी दारूदुकानाच्या समोर फळीवर उभं. नंतर काउंटरवरूनच प्रश्न आला ‘काय पाहिजे?’ पोरानं देशी ‘ब्रॅण्ड’ सांगितला. पन्नासची नोट दिली. त्याला दहा रुपये परत देण्यात आले. दारूची बाटली कागदात गुंडाळून देण्यात आली. ‘जा लवकर’ असं म्हणून त्याला तिथून जवळजवळ हाकलूनच दिलं. कुणालाच आश्चर्य वाटलं नाहीशनिवार पेठ परिसरातलं देशी दारूचं दुकान. तिथं बसून पिण्याचीही सोय. पाण्याची सोय, बाकडी, ग्लास असा जामानिमा तयार होता. तीन-चार माणसं पीत बसली होती. सोळा वर्षांंचा मुलगा दुकानात शिरला. काउंटरवर जाऊन बाटलीची मागणी केली. पण बाटली घेऊन मुलगा बाहेर पडला, तरी तिथं बसलेल्या कुणालाच त्याचं आश्चर्य वाटलं नाही. ‘कुणासाठी’ विचारलंच नाहीबसस्थानक परिसरात देशी दारूच्या विक्री केंद्रातच पिण्याचीही सोय. मिसरूडही न फुटलेला चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा घाबरत घाबरत आत शिरला. काउंटरवर जाऊन त्यानं देशी दारूच्या ‘चपटी’ची मागणी केली. ही बाटली कुणासाठी हवी, अशीही विचारणा न करता त्याला ‘चपटी’ देण्यात आली आणि घाम पुसत-पुसत मुलगा दुकानाबाहेर पडला.‘चकणा’ही दिलादेशी-विदेशी दारूचं नेहमी गजबजलेलं दुकान. बसस्थानक जवळ असल्यामुळं नेहमीच वर्दळ-गर्दी. लहानग्या मुलानं याच गर्दीतून काउंटरपर्यंत वाट काढली आणि एक विदेशी ‘ब्र्रॅण्ड’ सांगितला. त्याला बिनदिक्कत बाटली देण्यात आली. या मुलानं ‘चकणा’ही मागितला. त्यावेळी चणे-फुटाण्याची प्लास्टिकची पुडी त्याला देण्यात आली.कऱ्हाडात ‘वाईन’ विक्रेत्यांची ‘आयडिया’ चिमुकल्यांच्या हाती सोपवलं जातय मद्य, साधी विचारपूसही होईना ‘चिठ्ठी’ दिली की ‘बाटली’ हजर! कऱ्हाड : दहा-बारा वर्षाचा शाळकरी मुलगा दुकानात जाऊन एखादा खाऊचा पुडा घेऊन आला तर ती नवलाची गोष्ट नाही; पण तोच मुलगा दिवसाढवळ्या दारूच्या दुकानात जाऊन ‘देशी’ची बाटली घेऊन आला तर तो प्रकार धक्कादायक म्हणावा लागेल. कऱ्हाडातील काही दारू दुकानांमध्ये असाच प्रकार सध्या पाहावयास मिळतोय. वाईन शॉप व देशी दारूच्या दुकानातून शाळकरी मुलांच्या हातात बेधडकपणे दारूच्या बाटल्या सोपविल्या जातायत. ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून हे संतापजनक वास्तव समोर आलंय. दहा ते पंधरा वयोगटातील दोन शाळकरी मुलांना सोबत घेऊन ‘लोकमत’ची टीम बसस्थानक परिसरात गेली. एका मुलाला वाईन शॉपमध्ये पाठविले; मात्र, शॉपमधील कामगाराने त्या मुलास ‘ज्याला बाटली पाहिजे त्याला पाठवून दे,’ असे सांगून शॉपमधून बाहेर काढले. त्यानंतर ‘टीम’ स्टेशन रोडवर पोहोचली. एका चिठ्ठीवर दारूच्या बाटलीचे नाव लिहून ती चिठ्ठी मुलांकडे देण्यात आली. एका वाईन शॉपमध्ये पोहोचल्यानंतर संबंधिताने चिठ्ठी पाहून लागलीच ‘त्या’ ब्रॅन्डची बाटली मुलांसमोर ठेवली. तसेच ती बाटली एका कागदात गुंडाळून देत ‘खिशात ठेव’ असेही सांगितले. मंडईतील एका दारू दुकानातही असाच प्रकार घडला. दारू दुकानात गर्दी असताना एकानेही दारूच्या बाटल्या खरेदी करणाऱ्या मुलांना हटकले नाही. दुपारी मलकापुरात महामार्गानजीकच्या एका वाईन शॉपमध्ये मुलांना पाठविण्यात आले. मात्र, तेथील व्यक्तीने मुलांना ‘सुटे पैसे घेऊन या,’ असे सांगितले. दुसऱ्या एका शॉपीमध्ये मुलांना विक्रेत्याने बाटली दिली. मात्र, ती देताना त्याने ‘कोणासाठी पाहिजे,’ अशी विचारणाही केली. ‘घरी पाहिजे,’ असे मुलांनी सांगितल्यानंतर पुढे काही न बोलता विक्रेता उरलेले पैसे मुलांना परत करीत दुसऱ्या ग्राहकाकडे वळला. (प्रतिनिधी) कोणालाही देणं-घेणं नाही!‘लोकमत टीम’ने ज्या दारू दुकानांमध्ये मुलांना पाठविले त्यातील काही देशी दारूच्या दुकानांमध्ये पिण्याची सोय होती. त्यामुळे अनेकजण बाटली घेऊन तेथेच दारू घेत बसले होते. एवढ्या गर्दीत ही मुले दारूची बाटली मागत असूनसुद्धा एकानेही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. विक्रेत्यानेही रोजच्या सवयीप्रमाणे मुलांच्या हातात बाटली दिली, पैसे घेतले आणि दुसऱ्या ग्राहकाकडे वळला. म्हणे... नाव लिहून आण!वाईन शॉपमध्ये गेल्यानंतर दारूची कोणती बाटली मागायची, याची माहिती ‘लोकमत टीम‘ने सोबत असणाऱ्या दोन्ही मुलांना दिली होती. मात्र, एका शॉपमध्ये पोहोचल्यानंतर मुले गडबडली. त्यांना बाटलीचे नावच आठवेना. त्यावेळी संबंधित शॉपीमधील व्यक्तीने त्या मुलांना ‘कोणती बाटली पाहिजे ते कागदावर लिहून आणा,’ असा सल्ला दिला.महिलांकडूनही दारू खरेदीकऱ्हाड बसस्थानक व मंडई परिसरात ‘स्टिंग आॅपरेशन’ सुरू असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. काही वाईन शॉपमध्ये चक्क महिलाच दारूच्या बाटल्या खरेदी करायला आल्याचे पाहावयास मिळाले. मंडई परिसरातील एका शॉपमध्ये गेलेल्या महिलेने दारूची बाटली खरेदी करून ती सोबतच्या बाजाराच्या पिशवीमध्ये कोंबली.
पैशांच्या हव्यासाने नीतिमत्ता ‘बाटली’--स्ट्रिंग आॅपरेशन
By admin | Updated: March 23, 2015 22:42 IST