राजेश शेगोकार, बुलडाणावरूण राजा रूसल्याने पश्चिम वऱ्हाडावर दुष्काळाचे ढग दाटून आले आहेत. एकेकाळी कपाशी हे मुख्य पीक असलेला हा भाग गत काही वर्षात सोयाबीनकडे वळला; मात्र यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने खरिपाच्या प्रारंभापासूनच शेतकऱ्यांसाठी संकटांची मालिका सुरू झाली होती. पावसाने त्यामध्ये आणखी भर पाडली आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पश्चिम वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये १६ लाख ३१ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले; मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे संपूर्ण नियोजनच कोलमडले आहे. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेले असून, आर्द्रार् नक्षत्रही कोरडेच जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मूग, उडीद या दोन्ही पिकांचा पेरा करण्याची वेळ निघून गेली आहे. आता हा पेरा स्वतंत्रपणे होणारच नाही. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातून यावेळी उडीद व मूग ही दोन पिके जवळपास बाद झाल्यातच जमा आहेत. आता सूर्यफुलासारखे आपात्कालीन पीक घेऊनच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे. अकोला व बुलडाणा या दोन जिल्ह्यांमध्ये धूळ पेरणी करण्याचे प्रमाण बरेच आहे. यावर्षी अकोल्यात ६ हजार ८००, तर बुलडाण्यात ७ हजार ७०० हेक्टरवर झालेल्या धूळ पेरण्या उलटण्याच्या स्थितीत आहेत. केवळ पाण्याची सोय असलेले शेतकरीच पेरण्या जिवंत ठेवू शकले. २०१० ते २०१३ या चार वर्षांच्या पाऊस परिस्थितीवर नजर टाकली, तर पश्चिम वऱ्हाडात पहिला पाऊस साधारणत: ५ ते १५ जूनदरम्यान येऊन, खरीप हंगामाच्या पेरणीला सुरूवात होते, असे चित्र दिसते; परंतु यावर्षी अद्यापपर्यंत पाऊसच झालेला नाही. सरासरी ७०० ते ७५० मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या पश्चिम वऱ्हाडात यावर्षी अद्याप दोन अंकी आकडाही गाठला गेलेला नाही. गतवर्षी ३० जूनपर्यंत नदी-नाले ओसंडून वाहत होते, धरणंही भरली होती. यावर्षी मात्र ते कोरडेठण्ण आहेत. पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचे संकटही उभे ठाकण्याची चिन्हं दिसत आहेत. सद्यस्थितीत महिनाभर पुरेल इतका जलसाठा पश्चिम वऱ्हाडात आहे. बुलडाण्यात गतवर्षी गाळ काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्यामुळे सध्या जलसाठ्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे; मात्र हे पाणी जिल्हावासियांना जास्तीत जास्त दीड महिना पुरू शकेल. त्यामुळे वरूणराजाची कृपा लवकर झाली नाही, तर शेतकऱ्यांसोबतच इतर घटकांचेही हाल होणार आहेत.
पश्चिम वऱ्हाडावर दुष्काळाचे ढग
By admin | Updated: July 4, 2014 06:10 IST