लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा आरक्षणासाठी ९ आॅगस्ट रोजी मुंबईत महामोर्चाची हाक देणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आता समाजाच्या इतर मागण्यांचा पाठपुरावा शासनाकडे सुरू केला आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे स्वत: मराठा समाजाचे असून, मराठा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षण शुल्क व प्रवेशात विशेष सवलतीची घोषणा करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी सोमवारी केली.आठ दिवसांत यासंदर्भात ठोस भूमिका नाही घेतली, तर मराठा समाजाचे पालक व विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही समन्वयकांनी दिला आहे. समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी मिळून महामुंबई टीम स्थापन केली आहे. मराठा समाजातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी महामुंबई टीम मुंबई विभागातील विद्यार्थ्यांसाठी काम करेल. महामुंबईतील महाविद्यालयांत मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा आणि त्यांच्या शुल्कात कपात व्हावी, यासाठी पहिल्या टप्प्यात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. सरकारकडून फुटीचा प्रयत्नमोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र मराठा समाज त्याला बळी पडणार नाही. ३० मे रोजी निघणाऱ्या मोर्चाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध नसून आंदोलनाला केवळ शुभेच्छा दिल्या जातील, असे ते म्हणाले. मराठा जोडो अभियानमुंबई आणि नजीकच्या पाच जिल्ह्यांच्या समन्वयकांची मिळून महामुंबईची समिती गठीत केली जात आहे. वॉर्डनिहाय समित्याही गठीत केल्या जातील. त्यांच्या माध्यमातून हजारो मराठे ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर पोहोचतील. तिथे विविध उपक्रमांची घोषणाही केली जाईल.
शिक्षण शुल्क व प्रवेशात सवलत द्या!
By admin | Updated: May 30, 2017 04:34 IST