पुणे : राज्यातील भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. मात्र, विधिमंडळात काँग्रेसचे नेतृत्व आक्रमक नाही. पक्षाला सक्षम विरोधक म्हणून भूमिका निभावता आलेली नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी काँग्रेसला घरचा अहेर दिला. विधान परिषदेसाठी पक्षाकडून कोणतीही विचारणा झालेली नाही, तसेच आपणही उमेदवारी मागितली नसल्याचेही त्यांनी सांगितले. राणे म्हणाले, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनीही पक्षाला आक्रमक होण्याचा सल्ला दिला आहे. याचाच अर्थ असा की, पक्षात आक्रमकता दिसत नाही. सरकार अपयशी असेल तर विरोधीपक्ष म्हणून आम्ही यशस्वी होणे आवश्यक आहे. मात्र, पक्षाचे जे कोणी नेते आहेत; ते आक्रमक असल्याचे दिसत नाहीत. सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या भेटीत आपण विधान परिषदेची उमेदवारी मागितली नसल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला पक्षाकडून उमेदवारीबाबत विचारणा झालेली नाही आणि झाल्यास आपण त्याबाबत निश्चित विचार करू, असा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला. (प्रतिनिधी)मराठा आरक्षणाबाबत युतीचे मौनभाजपा-शिवसेनेवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, ‘दोन्ही पक्ष सत्तेसाठी हपापलेले असून, प्रत्येकाला मंत्री होण्याची घाई झाली आहे. धनगर तसेच मराठा आरक्षणाचे आश्वासन देऊन त्यांच्या नेत्यांना पदे दिली. आता हे नेते आरक्षणाबाबत काहीच बोलत नाहीत. फडणवीस सरकार मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. शिवसेनेचा तर आधीपासूनच विरोध होता. सरकारने न्यायालयात सक्षम बाजू न मांडल्याने आरक्षणाचा तिढा निर्माण झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.
विधिमंडळात काँग्रेस आक्रमक नाही
By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST