ठाणे : कळवा येथील अप्पर क्रस्ट इमारतीतील सदनिकेच्या नकाशामध्ये फेरफार केल्याप्रकरणी सदनिकाधारकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत बिल्डरसह आर्किटेक्ट आणि ठाणे पालिका कर्मचार्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. अशाप्रकारे मागील तीन दिवसात २० तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यामध्ये सदनिकाधारकांनी फसवणूक झाल्याचा आरोपही केला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. कळवा दत्तवाडी परिसरातील अप्पर क्रस्ट ही इमारत २०१०-२०११ विवेक मंगला यांनी आर्किटेक्ट प्रवीण जाधव यांच्या मदतीने बांधण्यात आली होती. सदनिका विकत घेताना बिल्डरने आणि आर्किटेक्टने सदनिकाधारकांना ठरवून दिलेल्या जागेपेक्षा कमी जागा त्यांना दिली आणि त्याबदल्यात एफएसआय मिळवून त्याचा स्वत:च्या कमर्शिअल इमारतीसाठी वापर केल्याचा आरोप संबंधित २० सदनिकाधारकांनी केला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात मागील तीन दिवसांत २० तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी या इमारतीबाबत पालिकेने मंजूर केलेले नकाशे, बिल्डरने दाखविलेले नकाशे, करारपत्रातील नकाशे या सार्यांची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
बिल्डर, आर्किटेक्टविरोधात तीन दिवसांत २० तक्रारी!
By admin | Updated: May 22, 2014 05:12 IST