भाजपाचा बडा नेता करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश? ठाणे, कल्याणसाठी महायुतीचं अखेर ठरलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 01:28 PM2024-04-01T13:28:02+5:302024-04-01T13:29:37+5:30

Lok Sabha Election 2024: ठाण्यात महायुतीकडून 'पालघर पॅटर्न' राबवला जाण्याची दाट शक्यता

BJP big shot leader Ganesh Naik son Sanjeev Naik may join Eknath Shinde Shiv sena to contest in Lok Sabha Election 2024 from Thane | भाजपाचा बडा नेता करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश? ठाणे, कल्याणसाठी महायुतीचं अखेर ठरलं...

भाजपाचा बडा नेता करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश? ठाणे, कल्याणसाठी महायुतीचं अखेर ठरलं...

Lok Sabha Election 2024 Shiv Sena BJP : लोकमत न्यूज  नेटवर्क, कल्याण: लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असून जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यातच महायुतीत कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर या जागांवरून सेना आणि भाजपामध्ये समझोता झाला असल्याचे समजते आहे. कल्याण लोकसभेची जागा ही शिवसेना शिंदे गटालाच देण्याचा निर्णय झाला असून श्रीकांत शिंदे यांनी या पार्श्वभूमीवर लोकांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केल्याचीही माहिती आहे. तसेच दुसरीकडे ठाण्यात पालघर  पॅटर्न राबवला जाण्याची दाट शक्यता आहे. यासाठी भाजपा पक्षातील इच्छुक उमेदवार तथा एक बडा नेता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करुन धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे या दोन्ही जागांवर आता तोडगा निघाला असून ठाण्याच्या जागेवरून महायुतीतही समझोता झाल्याची चर्चा आहे.

भाजपाचा 'तो' बडा नेता कोण?

सुरुवातीला धनुष्यबाण या चिन्हावर गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभेची जागा लढवावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादीमधून बाहेर पडून हाती कमळ घेतलेले आणि ज्येष्ठ राजकीय नेते असलेल्या नाईक यांनी यास नकार दिला. पण आता त्यांचे पुत्र संजीव नाईक यांचे नाव या जागेसाठी आघाडीवर आहे. त्यामुळे नाईक हे धनुष्यबाण हाती घेतात का? अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाण्याच्या जागेवर तोडगा काढताना जर ही लढत ठाकरे विरुद्ध भाजपा झाली तर सर्व सहानुभूती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळेल असा दावा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

ठाणे आणि धनुष्यबाण हे समीकरण महत्त्वाचे

ठाणे आणि धनुष्यबाण हे समीकरण किती महत्वाचे आहे यावरुन चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवार महायुतीतील कोणताही असो, त्याने हाती धनुष्यबाण घ्यावा असे मत शिवसेना शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आल्याचे समजते. तसेच कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील आपल्या प्रचाराचा नारळ वाढवला असून त्यांनी विविध लोकांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन जागांवरून दोन्ही मित्र पक्षात खलबतं सुरु होती. पण आता अखेर यावर तोडगा काढत ठाण्यात दोन्ही राजकीय पक्षांचं 'ठरलं' असं म्हणायला हरकत नाही.

Web Title: BJP big shot leader Ganesh Naik son Sanjeev Naik may join Eknath Shinde Shiv sena to contest in Lok Sabha Election 2024 from Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.