मोठा ट्विस्ट! उद्धवसेना-भाजपा एकत्र येणार? अडीच वर्ष महापौर पद मिळणार? मुंबईत घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 18:27 IST2026-01-26T18:21:31+5:302026-01-26T18:27:17+5:30
Municipal Election 2026 Mayor: राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांनंतर आता महापौरपदासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

मोठा ट्विस्ट! उद्धवसेना-भाजपा एकत्र येणार? अडीच वर्ष महापौर पद मिळणार? मुंबईत घडामोडींना वेग
Municipal Election 2026 Mayor: २९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाने राज्यभरात घवघवीत यश मिळवले. यानंतर आता या महापालिकांमध्ये महापौरपदासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच महापौर कुणाचा बसवायचा, यावरूनही अनेक महापालिकांमध्ये रस्सीखेंच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच उद्धवसेना आणि भाजपा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला असून, काही नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
चंद्रपूर महापालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने एकहाती ३६ जागांवर विजय मिळवून सत्ता काबीज केली होती. त्यावेळी पक्षात बंडखोरी नसतानाही काँग्रेसला १२ जागांच्या पुढे जाता आले नाही. भाजपाने सलग दोन टर्म एकहाती सत्ता राबवून काँग्रेसला बॅकफूटवर नेले. मात्र, यंदाच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने कमबॅक करत ६६ पैकी २७ जागांवर विजय मिळवला. यासोबतच या ठिकाणी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर आमने-सामने आले. या वादावर पडदा पडला असल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेस सत्तेपासून दूर करून महापौर बसवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस बहुमताच्या जवळ आहे. असे असले तरी आता काँग्रेस सत्तेपासून दूर राहू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसविरोधात उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, दोन अपक्ष नगरसेवक आणि भाजपा यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रपूर महापालिकेत बहुतासाठी ३४ जागांचा आकडा पाहिजे. भाजपाचे या महापालिकेत २४ नगरसेवक आहेत, तर उद्धवसेनेचे ६ नगरसेवक आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी दोन आणि अपक्ष दोन असे १० नगरसेवक होतात. भाजपाचे २४ आणि उद्धवसेना, वंचित, अपक्ष असे १० नगरसेवक मिळून ३४ चा बहुमताचा आकडा गाठला जाऊ शकतो. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेत आता भाजपा आणि उद्धवसेनेच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरेंचे नगरसेवक मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता
याच पार्श्वभूमीवर ठाकरेंचे नगरसेवक मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. उद्धवसेनेकडून चंद्रपूरमध्ये अडीच वर्ष महापौर पदाची मागणी करण्यात आली आहे. आता भाजपा ही मागणी मान्य करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या घडामोडींवर याबाबत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
आमच्या स्तरावर, जे शक्य आहे त्याबाबत आश्वासन दिले
त्यांचा आग्रह होता की, अडीच वर्ष महापौर पद देण्यात यावे. यावर मी त्यांना सांगितले की, आमच्या स्तरावर हा निर्णय कठीण आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटाल, तेव्हा तुमची मागणी ठेवा. आमच्या स्तरावर आम्ही जे शक्य आहे त्याबाबत आश्वासन दिले होते. सकारात्मक चर्चा झाली. त्या संदर्भात एक स्टॅम्प पेपरही तयार झाला होता. मात्र काही लोकांनी शिवसेना ठाकरे गटाला वेगळे आश्वासन दिल्याने प्रश्न निर्माण झाले, असे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चंद्रपूरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सलग पाचव्यांदा शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौरपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. महापालिकेत मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसमधील तीन नावे आघाडीवर आहेत. भाजपनेही बहुमतासाठी पडद्याआडून वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. या पक्षातूनही महापौर पदासाठी चार नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसकडून माजी महापौर संगीता अमृतकर, सुनंदा थोबे, संजीवनी वासेकर ही तीन नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत. भाजपकडे आशा देशमुख, सुनीता जयस्वाल, संगीता खांडेकर व सारिका संदूरकर या चार नगरसेविकांची नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत.