प्रताप नलावडे, बीडराज्यातील साखर कारखान्यांचे धुरांडे पेटू लागल्याने बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, जिल्ह्यातून ६ लाख मजुरांचे स्थलांतर होणार आहे. त्यामुळे आता पुढील सहा महिन्यांत ग्रामीण भागातील अर्थकारण संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण राज्यात बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजूर पुरविले जातात. ऊसतोडणी मजुरांचा जिल्हा अशीच बीडची ओळख आहे. जिल्ह्यातील ऊसतोडणी मजुरांनी आता कारखान्यांचा रस्ता धरला असून, याचा मोठा आर्थिक फटका ग्रामीण भागातील बाजारपेठेवर होणार आहे. जिल्ह्यातील अनेक गावे आणि तांडे अक्षरश: ओस पडतात. वयोवृद्ध मंडळी सोडली तर गावात इतर कोणीही थांबत नाही. ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना तब्बल सहा महिने हा फटका सहन करावा लागतो. गावातील किराणा दुकानात अनेकदा तर भोवणीही होत नसल्याचे चित्र असते.शेतात काम करण्यासाठी या सहा महिन्यांत मजूर मिळणे अवघड होऊन बसते. मजुरीचे दर या सहा महिन्यांसाठी अव्वाच्या सव्वा होऊन बसतात. ग्रामीण भागात मजूरच नसल्याने शेतीचेही संपूर्ण गणित बिघडून जाते. शेतकऱ्यांना इतर भागातून मजूर आणावे लागतात. यासाठी मोठी रक्कम शेतकऱ्यांना मोजावी लागते. ऊसतोडणीसाठी मिळणारी मजुरी ही एका कोयत्याला म्हणजे पती आणि पत्नीला मिळून एका टनासाठी १९० रुपये इतकी मिळते. शेतातील एका दिवसाची मजुरी यापेक्षा अधिक मिळत असली तरी ऊसतोडणी कामगारांना काम संपल्यानंतर मिळणाऱ्या ‘उचली’मुळे या मजुरांना ऊसतोडणीसाठी जावेच लागते. १५ ते २० जणांची एक टोळी असते. पती आणि पत्नी मिळून एक कोयता असे म्हटले जाते. साधारणत: या टोळीतील पुरुष ऊस तोडतात आणि उसाची मोळी बांधण्याचे काम महिला करतात. या टोळीला कारखान्यावरून काम संपवून परत निघताना लाख रुपयांपेक्षाही अधिक उचल या टोळीचा मुकादम देतो आणि नव्या हंगामासाठी त्याचे तोडणीचे काम निश्चित केले जाते. एकरकमी मिळणारी ही उचल हाच या मजुरांसाठी आकर्षणाचा भाग आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांतून हे मजूर जात असल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणावर याचा परिणाम होतो. आठवडी बाजार ओस पडतात. उदाहरणार्थ धारूर या तालुक्यातून ५० हजारांवर मजूर ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत व्यवसायाचे गणित बिघडते आणि व्यवसाय ३० टक्क्यांवर येतो़ परिणामी व्यापाऱ्यांना कमी माल मागवावा लागतो. देणी थकतात. धारूर येथील भूसार व्यापारी नितेश चिद्रवार सांगतात, मजूर असले की २० हजार रुपयांपर्यंत दररोजची आमची विक्री ठरलेली असते. परंतु एकदा मजूर गेले की पुढील सहा महिने ५ हजार रुपयांचा आकडाही ओलांडणे शक्य नसते.
बीडचे अर्थकारण संकटात़़!
By admin | Updated: November 17, 2014 03:51 IST