जयंत धुळप, अलिबागजागतिक स्तरावर सुप्रसिद्ध पेण व परिसरातील सुमारे ४० गावांतील गणेशमूर्ती निर्मिती आणि रंगकाम सध्या अखेरच्या टप्प्यात पोहोचले असून, यंदा लंडन, अमेरिका, दुबई आणि फ्रान्स असे सातासमुद्रापार गणराय पोहोचले आहेत. गतवर्षभरात तब्बल तीन हजार मूर्तिकार व कारागीर यांच्या अथक मेहनतीतून तब्बल सहा लाख गणेशमूर्तींची यंदा निर्मिती झाली असून, गणेशमूर्ती व्यवसायाची आर्थिक उलाढाल तब्बल ४० कोटी रुपयांवर पोहोचली असल्याची माहिती गणेशमूर्तिकार व हमरापूर ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश कदम यांनी दिली आहे.हमरापूरमधून ३०० गणेशमूर्ती परदेशी रवाना एकट्या हमरापूर ग्रामपंचायत हद्दीत गणेशमूर्ती निर्मितीचे ६० कारखाने असून, त्यात ३५० कारागीर व मूर्तिकार कार्यरत आहेत. यांच्या माध्यमातून १ लाख मूर्तींची निर्मिती झाली असून, एकट्या हमरापूर गावातून अमेरिका, दुबई व लंडन येथे ३०० गणेशमूर्ती रवाना झाल्याचे कदम यांनी सांगितले. मूर्तीच्या किमतीमध्ये ३० टक्क्याने वाढ सुबक मूर्ती, आकर्षक रंगकाम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बोलक्या डोळ्यांची आखणी हे पेणच्या गणेशमूर्तींचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य मानले जाते. या तीनही गोष्टींचा सुयोग्य त्रिवेणीसंगम साध्य करून कलेतून देवत्व साकार करण्याकरिता अगदी वर्षभराची मेहनत कारागीर आणि रंगकाम करणारे कलाकार करीत असतात, अशी माहिती हमरापूरमधील लावण्या कलामंदिरात रंगकाम करीत असतानाच महिला कारागीर संजना भगत यांनी दिली. रंगांचे आणि मातीचे यंदा वाढलेले दर आणि वाढलेल्या मजुरीमुळे यंदा मूर्तीच्या किमतींमध्ये ३० टक्क्याने वाढ करावी लागली असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.नाबार्डने प्रथम रोवली गणेशमूर्तिकार वित्त योजनेची मुहूर्तमेख देशातील एकमेव असणाऱ्या पेण व परिसरातील गणेशनिर्मिती व्यवसायास विशेष कला व औद्योगिक दर्जा देऊन, या व्यवसायातील समस्या दूर करण्यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी नाबार्डचे तत्कालीन रायगड जिल्हा महाव्यवस्थापक आनंद काशिद यांनी राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून विशेष वित्त व कर्ज योजनेचे नियोजन करून, पेण गणेशमूर्तिकार संघटनेची निर्मिती करून मोठ्या प्रमाणात वित्त वितरण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. त्यापुढच्या काळात गणेशमूर्तिकार संघटनेच्या माध्यमातून यासंदर्भात अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यातच पेण अर्बन बँक बुडीत निघाल्याने अनेक गणेशमूर्तिकारांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होऊन, काहींना आपले व्यवसाय बंददेखील करावे लागले.गरजेप्रमाणे कर्ज आणि गणेशोत्सवाअंती फरतफेडगणेशमूर्ती निर्मिती करणाऱ्या मूर्तिकारांना बँकेचे कर्ज घेऊन दरमहिन्यास त्या कर्जाचा हप्ता भरणे केवळ अशक्य असते; कारण गणेशमूर्तींची विक्री ही दररोज होत नसते तर वर्षातून एकदाच भाद्रपद चतुर्थीच्या १० ते १५ दिवस आधीच्या काळातच होते. बँकांच्या दरमहा कर्ज हप्ता परताव्याची कर्ज योजना या कारागिरांना योग्य ठरत नसल्याने, गरज असतानाही हे कारागीर बँकांचे कर्ज घेण्यास जात नसत. नेमकी हीच समस्या लक्षात घेत शासन प्राधिकृत रायगड जिल्ह्याची अग्रणी बँक असणाऱ्या बँक आॅफ इंडियाच्या येथील रायगड क्षेत्रीय कार्यालयाचे गतवर्षीचे महाव्यवस्थापक शिरीष कुळकर्णी यांनी या मुद्द्यावर विशेष अभ्यास केला आणि ‘गरजेप्रमाणे कर्ज आणि गणेशोत्सवाअंती फरतफेड’ अशी गणेशमूर्तिकार विशेष कर्ज योजना तयार करून रायगड जिल्हा प्रशासनास सादर केली.
हमरापूर-पेणचे बाप्पा फॉरेनला
By admin | Updated: August 25, 2014 03:24 IST