रहाटणी : गणपती बाप्पा मोरया.... आला रे आला गणपती आला....एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, असा जयघोष करीत बच्चे कंपनीसह गणेशभक्तांनी लाडका गणेशाला घरी आणण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. लाडक्या बाप्पाचे आनंदी व उत्साही वातावरणात सार्वजनिक मंडळासह घरगुती गणरायाचे आगमन झाले. मंडळाचे गणपती दुपारनंतर मंडपात आणण्यात आले, तर घरगुती गणपती अगदी सकाळपासूनच घरी आणून मनोभावे पूजा करून मूर्ती स्थापना करण्यात येत होती. गणपतीचे आगमन होणार. त्यामुळे लहान मुलांमध्ये उत्साह दिसून येत होता. रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर परिसर अगदी भक्तिमय झाल्याचे दिसून येत होते. परिसरात ठिकठिकाणी गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या, तर पूजेच्या साहित्याची दुकानेही थाटली होती.अनेक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणपती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी लहान थोरांनी हार, फूल, केवडा, कमळ, ध्रुवा यांसह विविध पूजेचे साहित्य खरेदीच्या दुकानामुळे परिसर गजबजून दिसून येत होता. गणपती आगमनाच्या वेळी लहान मुले नाचत, गात, जयजयकार करीत वाजत गाजत गणपती घरी आणण्यात आला. अगदी सकाळपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत पूजेचा मुहूर्त असल्याने घरगुती गणपतीची मूर्ती स्थापना अनेकांनी एक वाजण्याच्या अगोदरच करून घेतली. (वार्ताहर)>वाजतगाजत : पारंपरिक वाद्यांवर भरपरिसरात दुपारनंतर ढोल, ताशे, लेझीम याच्या गजरात गणपती आणण्यासाठी अनेक मंडळाच्या सदस्यांनी गर्दी केली होती. पिंपरी, काळेवाडी फाटा यांसह परिसरातून गणपती खरेदीची झुंबड उडताना दिसून येत होती. काही ठिकाणी गुलालविरहित मिरवणुका काढल्याचे दिसून येत होते. तर काहींनी पारंपरिक वाद्य वाजवत श्रींचे स्वागत केले. या वर्षी परिसरात डीजेसारख्या वाद्यांना बगल देण्यात आल्याचे दिसून आले. तर रस्त्यावर गर्दी होऊ नये, वाहतुकीला अडथळा होऊ नये, याची दक्षता अनेक मंडळे घेताना दिसून येत होते. महागाई वाढल्याने या वर्षी मूर्तींच्या किमती वाढल्याने अनेकांनी छोट्या गणपतीला पसंती देताना दिसत होते.पी. के. स्कूलमध्ये श्रींचे स्वागत पिंपळे सौदागर येथील पी. के. स्कूलमध्ये श्रींचे स्वागत करण्यात आले. सकाळीच विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात गणपतीचा जयजयकार करत गणपतीचे स्वागत केले . संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते महाआरती करून मूर्ती स्थापना करण्यात आली. या वेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासह परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तर काळेवाडीतील विजयनगर येथील शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक करण्यात आली.
उपनगरात गणरायाचे जल्लोषात आगमन
By admin | Updated: September 6, 2016 01:25 IST