विवेक चांदूरकर ल्ल अकोला आपला इतिहास आणि संस्कृतीचा उलगडा करणाऱ्या प्राचीन, अप्रतिम मूर्तिकलेचा अद्भुत नमुना असलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती, तोफ आणि इतर ऐतिहासिक वस्तू वऱ्हाडात इतस्तत: विखुरल्या आहेत. देखभालीअभावी त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या वस्तू ठेवण्यासाठी सिंदखेडराजा येथे वस्तुसंग्रहालय दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले होते; परंतु या ऐतिहासिक वस्तूंना संग्रहालयाचे कोंदण मिळण्यासाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा या तीन जिल्ह्यांना प्राचीन, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सुंदर व सुबक मूर्तिकलेचा नमुना असलेल्या मूर्ती, विविध धर्म-संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिल्पकृती, युद्धांमध्ये वापरण्यात आलेल्या तोफा या वस्तू विविध गावांमध्ये पडून आहेत. देखभालीअभावी त्यांची दुर्दशा होत आहे. या वस्तू ठेवण्याकरिता बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे एका संग्रहालयाची निर्मिती पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार होती. त्याकरिता ३ वर्षांपूर्वी २ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हा निधी २ वर्षांपूर्वीच बांधकाम विभागाकडे सुपुर्द करण्यात आला होता. सिंदखेडराजा येथे असलेल्या काळाकोट किल्ल्यामध्ये हे संग्रहालय बांधण्यात येणार होते. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे संग्रहालय अद्यापही बांधण्यात आले नाही. सिंदखेडराजा येथे राजवाडा व मंदिर परिसरात अनेक मूर्र्ती पडून आहेत. या मूर्र्ती भिंतीच्या कडेला टेकवून ठेवल्या आहेत. त्यापैकी काही मूर्र्र्तींची तुटफूट होत आहे. या दगडी मूर्तींची उन्ह व पावसामुळे झीज होत आहे. काही महिन्यांपूर्वीच सिंदखेडराजा येथील राजवाड्यातून तोफेची चोरी झाली होती. बाळापूर व बार्शीटाकळी येथेही बऱ्याच प्राचीन मूर्र्ती व वस्तू आहेत; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.