ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - मुंबई व मुंबईच्या उपनगरांमध्ये मांसाहारी लोकांना घरं नाकारण्यात येत होती. शाकाहारी लोकांना मांसाहाराचा वास सहन होत नाही अशी कारणं देत सर्रास घरं नाकारली जात. परंतू, या घटनेची दखल मनसेने घेत याबाबत पालिकेत प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला आज (गुरुवारी) पालिकेने सहमती दर्शवली असून बांधकाम व्यावसायिकांनी यापुढे मांसाहारी लोकांना घर नाकारणा-या बिल्डरांचा परवाना रद्द केला जाईल असा आदेश जारी केला आहे. या प्रस्तावाला शिवसेना व काँग्रेसने पाठिंबा दिला असून भाजपाने मात्र या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये बहूतांश मराठी मंडळी ही मासाहार करणारी आहेत. त्यांना मुंबईत घर घ्यायचे झाले असता ऐपत असूनही ते घेता येत नव्हते, बांधकाम व्यावसायिक त्यांना मासाहारी असल्याचे कारण देत घर नाकारत असत.फक्त शाकाहारी असणा-या लोकांनाच घरं विकत घेता येत. अनेक मराठी लोकांना या जाचक नियमाचा त्रास होत होता. अखेर पालिकेने या घटनेची दखल घेत बांधकाम व्यावसायिकांनी जर मांसाहारी लोकांना घर विकण्यास नकार दिला तर त्यांच्या इमारतीचा परवाना रद्द केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.