अकोला : कापसाचे नुकसान टाळण्यासाठी विदर्भातील ४८ टक्के कापूस उत्पादक शेतकर्यांनी तणनाशकांचा वापर केला आहे. वाढते तण आणि मजुरांची टंचाई यावर उपाय म्हणून शेतकरी तणनाशकांचा वापर करीत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.कापसामध्ये पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी पेरणीनंतरच्या २0 ते ६0 दिवसांचा आहे. या कालावधीत तणाचे नियंत्रण न केल्यास कापूस उत्पादनात लक्षणीय घट होते. राज्यातील कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी अर्धेअधिक क्षेत्र विदर्भात आहे. खरीप हंगामात कापूस व इतर सर्व पिकांची पेरणी एकाचवेळी केली जाते. त्या तुलनेत मजूर मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्याप्रवण विदर्भातील सहा जिल्हय़ांतील शेतकरी त्रस्त आहेत. म्हणूनच कापूस उत्पादक शेतकर्यांनी तणनाशकांचा वापर सुरू केला आहे; परंतु या शेतकर्यांपैकी किती टक्के शेतकरी तणनाशके वापरतात, कोणती व कशी वापरतात, याची अधिकृत व अचूक माहिती आतापर्यंत उपलब्ध नव्हती. यासाठी कापूस उत्पादक शेतकर्यांकडून तणनाशकांचा वापर या शास्त्रीय संशोधन प्रकल्पाचे सर्वेक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी यावर्षी पूर्ण केले असून, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा जिल्ह्यांतील ४८ टक्के कापूस उत्पादक शेतकरी तणनाशकांचा वापर करीत असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, वाशिम जिल्ह्यांतील कारंजा लाड, अमरावती जिल्ह्यांतील अंजनगाव सुर्जी, यवतमाळ जिल्ह्यांतील नेर व वर्धा जिल्ह्यांतील देवळी या तालुक्यातील गावे व तेथील कापूस पिकाचा अभ्यास केला आहे.** अभ्यासाअंती केलेल्या शिफारशीराज्य शासनाच्या कृषी विभागाने पेरणीपूर्व तणनाशकाविषयी प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रात्यक्षिके घ्यावीत. तणनाशकांच्या वापराविषयीची छापील सामुग्री तयार करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची मदत घ्यावी व त्या तंत्रज्ञानाचा शेतकर्यामंध्ये प्रचार व प्रसार करावा. त्यामुळे शेतकर्यांना तणनाशकाचे तांत्रिक ज्ञान मिळेल आणि प्रभावी तणनियत्रंण होण्यास मदत होईल, अशी शिफारस डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केली आहे. या प्रकल्पात डॉ. काळे यांच्यासह विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. डी.एम. मानकर , डॉ.पी.पी. वानखडे, डॉ.जे.पी. देशमुख यांनी काम पाहिले. सहा आत्महत्याप्रवण जिल्ह्यांत कापूस पिकासाठी वापरण्यात येणार्या तणनाशकांचा सूक्ष्म अभ्यास केला आहे. २00९-१0 मध्ये कापूस उत्पादक शेतकरी केवळ ३ टक्के तणनाशकांचा वापर करीत होते. ते प्रमाण आता ४८ टक्क्यांपर्यंंत पोहोचले आहे. यासाठी कृषी विद्यापीठाने अभ्यास करून राज्य शासनाकडे शिफारशी केल्या आहेत, असे कृषी विद्यापीठातील कापूस तणनाशक प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. एन.एम. काळे यांनी सांगितले.
विदर्भात ४८ % कापूस शेतक-यांकडून तणनाशकांचा वापर!
By admin | Updated: September 17, 2014 02:58 IST