गतवर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनचा भाव वाढेल, या अपेक्षेने मोठी साठवणूक केली हाेती. मात्र, शेवटी शेतकऱ्यांची घाेर निराशा होत प्रचंड आर्थिक नुकसान झाले. एक तर मालाची साठवणूक केल्यामुळे वजनात घट झाली.
वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर ३,८०० रुपयांचा भाव...
जवळपास वर्षाच्या कालखंडानंतर सोयाबीन जेमतेम ३ हजार ८०० रुपयांच्या भावाने विकण्याची शेतकऱ्यावर पाळी आली. कहर म्हणजे, गतवर्षी सोयाबीनचा हंगाम सुरू झाला, तेव्हा हा भाव साडेचार हजार रुपयांपर्यंत गेला हाेता. या दरात वाढ होईल या आशेने शेतकरी माल साठविला. मात्र, अचानक कोरोनाचा कहर सुरू झाला. सोयाबीनच्या भावाला उतरती कळा सुरू झाली आहे. साडेचार हजार रुपये असलेला भाव साडेतीन हजार रुपयाच्या आसपास येऊन थांबला आहे. भावातही घसरण झाली आहे, शिवाय माल साठवणूक केल्याने मालाच्या वजनात प्रतिक्विंटल किमान पाच ते सात किलोची घट झाली आहे. यातून दुहेरी तोट्याचा मार गतवर्षी शेतकऱ्यांना सहन करावा लागाला.
साठवणूक केली मात्र भाव जेमतेमच...
यंदा सोयाबीनची रास झाल्यानंतर, भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली. मात्र, पुन्हा कोराेनाचा कहर सुरू झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी भांबावलेल्या अवस्थेत साडेतीन ते चार हजार रुपयांच्या भावात सोयाबीन विकला आहे. विकलेला शेतमाल देवणी येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केला. मात्र, त्यांनीही कोरोनाच्या धास्तीने, गतवर्षीच्या अनुभवातून चार ते पाच हजार रुपयांच्या आवाक्यात सोयाबीनचा साठा विक्री केला आहे. आता सोयाबीनच्या भावाने एकदम उसळी घेतल्याने आणि दिवसेंदिवस भावात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांसोबत येथील व्यापारीही हतबल झाले आहेत. कोरोनाच्या लहरीने आणि भावाने कहर केल्याचे मत शेतकरी, व्यापारी व्यक्त करत आहे. सोयाबीनसह तूर, हरभरा आणि करडईलाही चांगला भाव मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे.