लातूर : ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची आशा सर्वच करतात. मात्र, खेळाडूंना मिळणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार आपण कधी केलाय का, पदक मिळविण्यासाठी खेळाडूंना सोयीसुविधांची गरज असते. त्या बळावरच ते आपले कौशल्य विकसित करतात. लातुरातही अनेक क्रीडा विकासकामे मंजूर झाली आहेत. मात्र, प्रत्यक्ष कामांना मुहूर्त न लागल्याने क्रीडा विकास खुंटला आहे.
लातूर हे क्रीडा क्षेत्रात विभागीय ठिकाण आहे. लातूरसह उस्मानाबाद व नांदेड हे जिल्हे यात कार्यरत आहेत. विभागीय ठिकाण असल्याने अनेक वर्षांपूर्वी लातूरला विभागीय क्रीडा संकुल मंजूर झाले आहे. २०१४ साली कव्हा येेथील जागेवर भूमिपूजनही करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी संरक्षक भिंतीचे कामही सुरू करण्यात आले होते. मात्र ते सध्या बंद अवस्थेत आहे. त्यामुळे विभागीय संकुलाचे काम सद्य:स्थितीत बंदच आहे. त्यामुळे खेळाडूंना चांगल्या सुविधांसाठी वाटच पहावी लागणार आहे. ॲस्ट्रो टर्फ हॉकीचे मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, सिंथेटिक ४०० मीटर धावणपथ यासह अनेक खेळांचे अद्ययावत मैदान या ठिकाणी होणार आहे. या माध्यमातून विभागातील अनेक खेळाडूंना याचा फायदा होणार आहे. मात्र, काम बंद असल्याने क्रीडा विकासाची गती मंदावली आहे. यासह जिल्हा क्रीडा संकुलातील पाच क्रीडा विकासकामांनाही गतवर्षीपासून ब्रेक लागला आहे. त्यामुळे येथील विकासाची कामाचे चक्रही रुतले आहे. यात मुख्यत: नव्याने होणारे स्व्कॅश कोर्ट, व्हाॅलिबॉल मैदानाची दुरुस्ती, मुख्य मैदानातील ड्रेनेज सिस्टीम, ओपन गॅलरी व क्रिकेटच्या टर्फ विकेटचा यात समावेश आहे. ही सर्व कामे ठप्प असल्याने क्रीडा क्षेत्रातून नाराजीचा सूर उमटत आहे. गतवर्षीच या पाच कामांच्या निविदा निघाल्या होत्या. या कामांची ऑर्डरही देण्यात आली होती. मात्र, काम का रखडले अनुत्तरित प्रश्न आहे. खेळाडूंच्या कौशल्यवाढीसाठी ही विकासकामे गरजेची आहे. मात्र कामे रखडल्याने खेळाडूंतून नाराजी व्यक्त होत आहे.
व्हॉलिबॉलचे नूतनीकरण, नवीन स्क्वॅश कोर्ट रखडले...
क्रीडा संकुलातील पाच कामांत मुख्यत: नवीन स्क्वॅश कोर्ट निर्मिती आहे. नव्या खेळाची ओळख लातूरच्या खेळाडूंना व्हावी ही अपेक्षा आहे. यासह व्हॉलिबॉलचा लातूरला इतिहास आहे. अनेक खेळाडूंनी या खेळात छाप सोडली आहे. त्यामुळे व्हॉलिबॉल मैदान नूतनीकरण करणे गरजेचे आहे. ही कामे ठप्प असल्याने खेळाडूंना अडचणींना तोंड देत सराव करावा लागत आहे.
क्रीडा प्रबोधिनीचा प्रस्ताव गेला, पुढे काय...
राज्यातील प्रत्येक विभागात क्रीडा प्रबोधिनी आहे. यास केवळ लातूर अपवाद आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबत राज्य शासनास क्रीडा विभागामार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याचाही पाठपुरावा करणे गरजेचे आहे. व्हॉलिबॉलचे इनडोअर मैदानही शहरात गरजेचे आहे. जलतरण तलावाचाही प्रश्नही शहरात ऐरणीवर आहे. या सर्व क्रीडाविषयक बाबींवर पालकमंत्र्यांनी लक्ष घालून कामे पूर्णत्वाकडे न्यावीत, अशी अपेक्षा क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, खेळाडूंमधून होत आहे.