लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : पेट्रोल व डिझेलच्या किमतीत गेल्या ३० वर्षांत लिटरमागे ८३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर झाला असून, जीवन जगताना कसरत करावी लागत आहे.
गेल्या ३० वर्षांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये पेट्रोल प्रति लिटर ९८.५० रुपयांनी वाढ झाली आहे. फक्त पेट्रोलच्या किमतीतच वाढ झाली नाही तर डिझेलही महाग होत असल्याने वाहतूक व्यवस्था महागली आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्यांचे दर, फळांचे दर, गॅस दरवाढ, किराणा व्यवसाय या सर्वच गोष्टींवर दिसून येत आहे. पूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दीड-दोन महिन्यांनी दरवाढ केली जात असत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्याने दरवाढ केली जात आहे. या किमती नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे.
तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स लागतोय जास्त
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असल्या तरी पेट्रोल-डिझेलसाठी टॅक्स आकारला जात आहे. निवडणुकीच्या काळात पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ होत नाही. मात्र, त्यानंतर अचानक दरवाढ केली जाते. आधीच कोरोना आणि त्यात इंधनाची दरवाढ, यामुळे जगणे अवघड झाले आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे घर कसे चालवावे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पूर्वी सायकलवर फिरत होतो. कामाच्या व्यापामुळे सायकलचा वापर बंद करून दुचाकीवर प्रवास सुरू केला. गेल्या तीन ते चार वर्षांपासून पेट्रोलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शंभरीचा टप्पा लवकरच गाठणार असल्याने पुन्हा सायकलवर फिरावे लागते की काय, असे चित्र आहे. शासनाने दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्याची गरज आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अनेकांना तर काटकसर करीत जीवन जगावे लागत आहे. - नागरिक
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाहन चालवावे की नाही, असा प्रश्न आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने दरवाढ होत आहे, असे सांगत असले तरी दर नियंत्रणात हवे.
- नागरिक
पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे. २०० ते ३०० रुपयांचा फटका नांगरणी, मोगडणीमागे सहन करावा लागत आहे. शासनाने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेत.
- नागरिक