लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. हे जवळपास १५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे महावितरणचे उपकेंद्र आहे. येथून १६ गावांना वीज पुरवठा होतो. मात्र, दररोज विजेच्या लंपडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आठ दिवसांपूर्वी भुयारी मार्गातील केबल तुटले आणि तब्बल १४ तास वीज खंडित झाली होती.
सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने अंगाची लाही- लाही होत आहे. दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी रात्री ११ वा.च्या सुमारास उपकेंद्राजवळील बरड डीपीवरील केबल जळाले. हे केबल गुरुवारी सकाळी ९ वा. बदलण्यात आले. त्यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात रहावे लागले.
यासंदर्भात हरंगुळ सर्कलचे उपअभियंता बिराजदार यांनी कुठेतरी बिघाड झाला असावा असे म्हणत माहिती देण्यास टाळले. दरम्यान, येथील महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने वेळेवर कामे होत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.