नोटबंदीनंतर देशात रिझर्व्ह बँकेने सुरुवातीस २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. तेव्हा सुटे करण्याचा प्रश्न निर्माण होत असे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ५००, २००, १००, ५०, २०, १० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या. त्यामुळे सुटे करण्याचा त्रास कमी झाला. तसेच चलनात जुन्यापेक्षा नवीन नोटांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जुन्या नोटांचे चलनातील प्रमाण कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. नवीन आलेल्या २ हजार, ५००, १०० रुपयांच्या नोटांचा रंग फिकट होत असल्याचे निरीक्षणावरून दिसून येत आहे. त्यामुळे या नोटांचा व्यवहारात सर्वाधिक वापर केला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.
२ हजारांच्या नोटांचा व्यवहार कमी...
सुरुवातीच्या कालावधीच्या तुलनेत सध्या २ हजारांच्या नोटांचे चलनातील प्रमाण कमी झाले आहे. कारण बहुतांश लोकांनी या नोटांचा संचय करून ठेवला आहे. बँकेत २ हजार रुपयांच्या नोटा ठेवीचे प्रमाण घटले आहे. सध्या ५०० रुपयांच्या नोटांचा सर्वाधिक वापर वाढल्याचे राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अद्याप एकही तक्रार नाही...
नवीन नोट पाण्यात भिजली तरी तिचा रंग उडत नाही. तसेच जिल्ह्यातून एकही तक्रार दाखल झाली नाही, असे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.
ठळकपणा कमी...
पूर्वीच्या जुन्या नोटा कितीही खराब झाल्या तरी त्यांचा ठसठशीतपणा कमी होत नव्हता. वापरामुळे नोट फाटत असे, पण तिचा ठळकपणा कायम असे. मात्र, नवीन नोटांचा रंग हाताळणीनंतर फिकट होत आहेे, असे निरीक्षणावरुन दिसून येत असल्याचे एआयबीईए संघटनेचे राष्ट्रीय सचिव कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.