लातूर : हातावर पोट असणारे सलून व्यावसायिक कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या पहिल्या फेजमध्ये तब्बल सात महिने व्यवसाय बंद राहिला. आता पुन्हा एक महिना व्यवसाय बंद राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात २ हजार ४०० हेअर सलून आहेत. त्यापैकी लातूर शहरात ५१८ व्यावसायिकांची दुकाने आहेत. यातील ९० टक्के दुकाने भाड्याने आहेत. पूर्वीच्या लाॅकडाऊनमधील सात महिन्यांचे भाडे थकलेलेच आहे. आता कुठं व्यवसाय रुळावर आला होता. त्यातच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने दुकानाचे भाडे भरावे की घरप्रपंच भागवावा, असा प्रश्न या व्यावसायिकांपुढे आहे. या सर्व हेअर सलूनमध्ये पाच ते सहा हजार कारागीर आहेत. शहरातील ९५ टक्के कारागीर व दुकानदार भाड्याने राहतात. आता व्यवसायच बंद झाल्यामुळे खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नाभिक महामंडळाने हेअर सलून व्यावसायिकांना कोरोना नियमांचे पालन करून व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे नाभिक महामंडळाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन हा प्रस्ताव ठेवला. मात्र, त्याकडे अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे सलून व्यावसायिक अन् कारागीर चिंतेत आहेत.
९५ टक्के लातूर शहरातील हेअर सलूनची दुकाने भाड्याने आहेत. घरभाडे, दुकानभाडे आणि घरप्रपंच भागवायचा कसा, यावर सरकारने उत्तर दिले नाही. उलट व्यवसाय बंद करून पोटावर मारले आहे.
- भाऊसाहेब शेंद्रे, जिल्हाध्यक्ष नाभिक महामंडळ
सलून व्यावसायिकांची दुकाने बंद करताना, त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करायला हवा होता, परंतु हा विचार शासनाने केला नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीमुळे मरण्याची वेळ आली आहे.
- केदारनाथ गवळी, शहराध्यक्ष नाभिक महामंडळ
नियमांचे पालन करून सलून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यायला हवी. या व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह आहे. त्यामुळे शासनाने फेरविचार करून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.
- महेश माने, व्यावसायिक
कोरोनाच्या संकटामुळे हेअर सलूनची दुकाने बंद ठेवण्याचा शासनाने घेतलेला निर्णय आमच्या उपासमारीचे कारण ठरत आहे. त्यामुळे शासनाने दुकाने बंद ठेवायचे असतील, तर आमच्यासाठी आर्थिक मदत कारावी.
- अमोल सूर्यवंशी, तुकाराम सूर्यवंशी, कारागीर