कोल्हापूर : पतीच्या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो; तशा पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रारी नोंदही होतात; पण पत्नीनेच चक्क तांब्या फेकून मारल्याने तो डोक्यात लागूृन पतीच गंभीर जखमी झाल्याची अनोखी घटना कोल्हापुरात साने गुरुजी वसाहतीमध्ये शनिवारी घडली.
घरगुती वादातून प्रत्येक वेळी पत्नीलाच मारहाण केली जाते, त्यामुळे पत्नीच चक्क पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार देते; पण शनिवारी सायंकाळी साने गुरुजी वसाहतीमध्ये एका ४४ वर्षीय पती आणि ३९ वर्षीय पत्नीत घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. वाद विकोपाला गेला. अखेर रागाच्या भरात चक्क पत्नीनेच स्वयंपाक खोलीतील तांब्या उचलून पतीला जोरात फेकून मारला. तो जाडजूड तांब्या पतीच्या कपाळावर लागल्याने तो जखमी झाला. त्याने रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने सरकारी रुग्णालय गाठले. त्याच्यावर रुग्णालयात मलमपट्टी करण्यात आली. त्यावेळी त्याने चक्क पत्नीनेच तांब्या फेकून मारल्याची तक्रार दिल्याने तेथील डॉक्टरांसह पोलीसही अवाक् झाले. अखेर पत्नीविरोधात तांब्या फेकून मारल्याची तक्रार नोंदवहीत पोलिसांनी लिहून घेतली. त्याची जोरदार चर्चा सरकारी रुग्णालयात सुरू होती.