इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील ओढ्यावरील पुलाजवळ एका संशयिताला दोन गावठी पिस्तुलांसह अटक केली. प्रवीण दत्तात्रय रावळ (वय २८, रा. सावली सोसायटी, शहापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांत नोंद झाली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्याकडे दोन पिस्तुले सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असली, तरी पोलिसांनी मात्र याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती, तर या प्रकरणामध्ये आणखी काही वेगळा प्रकार असावा काय, याबाबत उलट-सुलट चर्चा परिसरात सुरू होती. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी (दि. २) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कबनूर-दत्तनगर मार्गावरील ओढ्याच्या पुलाजवळ प्रवीण रावळ हा आपल्या हीरोहोंडा मोटारसायकलसह संशयितरीत्या थांबला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीची दोन पिस्तुले, पाच लहान व दोन मोठी जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या ताब्यातील मोटारसायकलही जप्त केली आहे. पिस्तुले, काडतूस व मोटारसायकल असा एकूण एक लाख पाच हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. संशयित रावळ हा संतोष बाबर यांच्या खुनातील संशयित आरोपी होता. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रावळकडे ही पिस्तुले आली कोठून, ही हत्यारे बाळगण्याचा त्याचा नेमका उद्देश काय, याचा तपास पोलीस करू शकले नाहीत. दरम्यान, चार वर्षांपूर्वी अशाच एका गावठी पिस्तूल प्रकरणात मनीष नागोरी याला पोलिसांनी अटक केली आणि या प्रकरणाप्रमाणे जुजबी तपास करून सोडून दिले. कारवाईची भीती न राहिल्याने किरकोळ चोरीचे मोबाईल घेऊन विक्री करणारा नागोरी पुढे मोठा पिस्तूल तस्कर बनला. कोल्हापूर गुन्हे शोधपथकाने नागोरीला अटक करून त्याने इचलकरंजीत पिस्तूल विक्री केलेल्यांची नावे काढून मोठे अटकसत्र राबविले. यामध्ये शहरातील किरकोळ गुंडांसह मोठमोठी राजकीय मंडळींही अडकली होती. अशा पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक होते; मात्र पोलिसांकडून हलगर्जीपणा करण्याचे नेमके कारण काय, हे समजू शकले नाही. (प्रतिनिधी)
इचलकरंजीत दोन पिस्तुले जप्त
By admin | Updated: October 5, 2014 00:46 IST