Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव-शाहू आघाडीतच सामना, ६५ जागांसाठी २३० उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:39 IST2026-01-03T12:35:56+5:302026-01-03T12:39:09+5:30
शिंदेसेना १, राष्ट्रवादी १ यांच्यासह १० अधिकृत पक्षांच्या उमेदवारांची माघार, काही प्रभागांत मैत्रीपूर्णच्या नावाखाली बहुरंगी लढती

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव-शाहू आघाडीतच सामना, ६५ जागांसाठी २३० उमेदवार रिंगणात
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या १५३ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. काहींनी अवघे चार मिनिटे शिल्लक राहिल्यानंतर अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेईपर्यंत काही उमेदवारांची धाकधूक वाढली होती. बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलेल्या भाजपच्या २२ उमेदवारांचे मन वळविण्यात पक्षाला यश आले. निवडणूक रिंगणात २३० उमेदवार राहिले असून, माघारीनंतर महायुती आणि शिव-शाहू आघाडीमध्ये दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. गेल्या दोन दिवसांपासून अपक्षांची मनधरणी करण्याचे काम सुरू होते. त्याला यश आले. अनेक अपक्षांनी शुक्रवारी माघार घेतली. उमेदवारी न दिल्याने नाराज होऊन उमेदवारी दाखल केलेल्या भाजपच्या बहुतांशी उमेदवारांचे मन वळविण्यात यश आले. त्यातील नाराज २२ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
वाचा : कोल्हापुरात सर्वत्रच बहुरंगी लढती; ८१ जागांसाठी ३२५ उमेदवार रिंगणात
भाजपच्या अश्विनी कुबडगे यांनी अवघे तीन ते चार मिनिटे बाकी असताना आपला अर्ज मागे घेतला. मागे घेणाऱ्या शहरातील प्रमुखांमध्ये बाळकृष्ण तोतला, इकबाल कलावंत, नागेश पाटील, आदींचा समावेश आहे. शिंदेसेनेचे उमा महादेव गौड, राष्ट्रवादीचे इचलकरंजी शहर कार्याध्यक्ष अमित गाताडे, युवा महाराष्ट्र सेनेचे सोहेल पटेल, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुनीता विनोद आवळे, संगीता निर्मळे, वर्षा कांबळे, बादल सलीम शेख, संध्या मोहन बनसोडे, आरपीआय आठवले गटाच्या रोहिणी गेजगे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली.
उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. अपक्ष वगळता आजच्या माघारीनंतर महायुती व शिव-शाहू विकास आघाडीमध्ये दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. काही ठिकाणी एकास एक लढत होणार आहे, तर काही प्रभागांतील जागेमध्ये एकापेक्षा जादा उमेदवार असणार आहेत.
आमदारांनी गाठले घर
भाजपमध्ये विविध पदांवर काम करणारे आणि उमेदवारीवर हक्क असलेल्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली होती. शुक्रवारी शेवटच्या दिवशी आमदार राहुल आवाडे अनेकांच्या घरी जाऊन, तर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी फोनवरून चर्चा करून त्यांना मागे घेण्यास सांगितले.
स्वीकृतची बंपर ऑफर
भाजपकडून ज्या उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यातील अनेकांना स्वीकृत नगरसेवक करण्याची ऑफर देण्यात आली. स्वीकृत नगरसेवकाची ऑफर दिल्याचे माघारीनंतर अनेक उमेदवारांनी सांगितले.
शहापूर केंद्र ठरले चर्चेत
एका राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या एका उमेदवाराने शुक्रवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी शहापूर येथील प्रभाग समिती कार्यालयाजवळ शेवटच्या क्षणाला माघार घेण्यासाठी आला होता. परंतु त्याठिकाणी त्याचे वडील आणि भाऊ यांनी त्याला अडवून धरत माघार घ्यायची नाही, अशी भूमिका घेतली. या चर्चेत वेळ निघून गेली. त्याचबरोबर अनेक अपक्षांना काही उमेदवारांनी आपल्या मोटारीतून माघारीसाठी घेऊन आले. त्यांची लगबग त्या केंद्रावर चर्चेची ठरली.