कोल्हापूर : गांधीनगर येथील रि.स.नंबर २६३६ या सरकारी जागेबाबत कोल्हापूरच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाला आज पुणे विभागीय अपर आयुक्त यांनी पुढील सुनावणी होईपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली. या प्रकरणी आता १९ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील रि.स. नंबर २६३६ या ५७.१६ आर पैकी सरकारी जमीनीवर ५१ व्यापारी व दुकानदार असलेल्या मिळकतधारकांनी अतिक्रमण केले आहे. त्याबाबत काही जणांनी तक्रारी केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढून ती सरकार हक्कात घ्यावी, असे आदेश दिले होते. २४ आॅगस्ट २०१२ रोजी या जमिनीवर उभारलेली ३६ दुकाने सील करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्याकडे अपिल करण्यात आले होते. तेथे त्यांनीही जमीन सरकार हक्कात घेण्याचा आदेश कायम केला होता.विभागीय आयुक्तांच्या विरोधात महसूल मंत्री थोरात यांच्याकडे अपिल केले गेले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे हे प्रकरण पुनर्विचारार्थ पाठविण्यात आले. तेव्हा अपर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी आपल्या अधिकारात गांधीनगर येथील या जमिनीवरील बांधकाम ठराविक रक्कम भरून घेऊन नियमित करून देण्यात यावीत असा आदेश दिला होता. सुमारे एक एकर ३३ गुंठे ही जमीन केवळ ७५ हजार रुपये भरून घेण्याचे आदेश पवार यांनी दिले होते. त्याच्या विरोधात ४ जुलै रोजी हिरालाल केशव गळीयल (रा. गांधीनगर) व कोल्हापुरातील प्रजासत्ताक संघटनेने विभागीय अपर आयुक्तांकडे अपिल केले होते. आज अर्जदार गळियल तर्फे अॅड. भावके यांनी युक्तीवाद केला. त्यामुळे पुढील १९ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीपर्यंत अपर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्या आदेशाला स्थगिती दिली. (प्रतिनिधी)
गांधीनगर जमिनीबाबत तात्पुरती स्थगिती
By admin | Updated: July 8, 2014 00:59 IST