गडहिंग्लज : स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे एकाचवेळी कुटुंबातील सर्वांनाच तंत्रज्ञानाचे व्यसन जडले आहे. दारू, सिगारेट व अमली पदार्थांच्या व्यसनापेक्षाही ते भयानक आहे. भविष्यात हीच मोठी जागतिक समस्या असेल, असे स्पष्ट मत संगणक शास्त्राचे अभ्यासक अतुल कहाते यांनी व्यक्त केले.केदारी रेडेकर संस्था समूहातर्फे आयोजित केदारी रेडेकर स्मृती व्याख्यानमालेत ‘तंत्रज्ञानाचा ओव्हरडोस’ या विषयावर ते बोलत होते. नवीन तंत्रज्ञानाची उपयोगीता न समजल्यामुळे त्याचा अतिरिक्त वापर वाढला असून, त्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व मानसिक समस्यांबद्दल त्यांनी सोदाहरण विवेचन केले. याप्रसंगी ‘अवनि’च्या अनुराधा भोसले यांना २१ हजारांचा ‘केदारी रेडेकर जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा अंजना रेडेकर होत्या.कहाते म्हणाले, नवीन पिढी तंत्रज्ञान घेऊन जन्मली आहे. नवीन गोष्टींचे आकर्षण व पाश्चात्य संस्कृतीच्या ओढीमुळे ती उथळ बनली आहे. स्मार्ट फोनमुळे माणसातील संवाद कमी झाला असून, त्याचा मनावर व शरीरावर गंभीर परिणाम होत आहे. अनुराधा भोसले म्हणाल्या, पुरस्कारांचे आता कौतुक राहिलेले नाही. कॉ. गोविंद पानसरे यांच्यामुळेच चळवळीशी संबंध आला. वंचितांच्या कामाबद्दल मिळालेला पुरस्कार त्यांनाच अर्पण करत आहे.संस्थाध्यक्षा रेडेकर म्हणाल्या, सामाजिक बांधीलकीतूनच विविध संस्था चालवित आहोत. त्यातूनच नवी ऊर्जा व शक्ती मिळत आहे. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांचेही भाषण झाले. उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, सचिव प्रा. सुनील शिंत्रे, प्रा. श्रीकांत नाईक, प्राचार्या वीणा कंठी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. एस. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुभाष कोरे यांनी मानपत्रवाचन केले. डॉ. सुधीर येसणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मंगला मोरबाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
तंत्रज्ञानाचे व्यसन सर्वांत भयानक
By admin | Updated: March 12, 2015 23:55 IST