लोकमत न्यूज नेटवर्क
विनोद सावंत/ कोल्हापूर : एकेकाळी मुक्त सैनिक वसाहत प्रभाग क्रमांक १९ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. गत निवडणुकीमध्ये येथे ताराराणी आघाडीने बाजी मारली. यंदाच्या निवडणुकीत बालेकिल्ल्यावर पुन्हा कब्जा मिळवण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे. मात्र, ताराराणी आघाडीचे त्यांना कडवे आव्हान असणार आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षित झाल्याने अनेकांचा पत्ता कट झाला आहे. असे असले तरी इच्छुकांची भाऊगर्दी असून, ८ ते १० तगडे उमेदवार रिंगणात आहेत.
तावडे हॉटेल येथून शहरात प्रवेश केल्यानंतरचा प्रभाग म्हणजे मुक्त सैनिक वसाहत प्रभाग क्रमांक १९ आहे. तो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. येथे माजी नगरसेवक राजेंद्र डकरे यांचा प्रभाव आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत २० वर्षे महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये ते स्वत: दोनवेळा, त्यांच्या पत्नी वैशाली डकरे एकदा आणि चुलते बाजीराव डकरे एक वेळा विजयी झाले. वैशाली डकरे यांनी महापौरपदही भूषविले आहे. त्यांनी प्रभागात चांगली विकासकामे केली. त्यांच्यासह राजेंद्र कसबेकर आणि संगीता काटकर यांनीही या प्रभागातून महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे.
काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला गत निवडणुकीत ताराराणी आघाडीचे राजसिंह शेळके यांनी खिंडार पाडले. ही निवडणूक शेळके आणि अपक्ष पंकज काटकर यांच्यात चुरशीची झाली. यामध्ये शेळके यांनी बाजी मारली. राजेंद्र डकरे यांनी काटकर यांना पाठिंबा दिला होता. अपक्ष असूनही त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला.
राजसिंह शेळके यांचा बँक अधिकारी ते नगरसेवक असा प्रवास लक्षणीय ठरला. त्यांनी गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या सभागृहात प्रभावी कामगिरी केली. बोगस पाणी कनेक्शनचा भांडाफोड केला. विभागीय कार्यालयांना पुन्हा बांधकाम परवानगी देण्याची मागणी जोर लावून धरली. शहरातील पार्किंगच्या समस्यासाठी त्यांनी वारंवार प्रशासनाला धारेवर धरले. कत्तलखान्यातील दुरवस्थाबाबतही त्यांनी आवाज उठविला. या निवडणुकीत हा प्रभाग अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने ते शेजारील महाडिक वसाहत प्रभाग क्रमांक १८ मधून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा असून ,ताराराणी आघाडीच्या नेत्यांच्या आदेशानंतर पुढील दिशा ठरविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अनुसूचित जाती महिला प्रवर्ग प्रभाग म्हटले की इच्छुकांची संख्या फारसी नसते. पक्षांना उमेदवार शोधण्याची वेळ येते. मुक्त सैनिक वसाहत प्रभाग याला अपवाद ठरत आहे. येथे ८ ते १० उमेदवारांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. यामध्ये सुवर्णा कांबळे, सुधा खांडेकर, स्वाती सातपुते, कीर्ती भोपळे, कांचन समुद्रे, अश्विनी मांडरेकर, रूपाली पोवार, वृक्षाली कांबळे यांच्या नावाची चर्चा आहे. ऐनवेळी आणखी दोन उच्चशिक्षित महिला उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया
विरोधी आघाडीत असतानाही सुमारे दोन कोटींचा निधी खेचून आणला. पूर परिसर असल्याने केलेले रस्ते खराब हाेण्याचे प्रमाण जास्त आहे. तरीही २५ वर्षांत झाली नसलेली गटारे व रस्ते केले. जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्यालयात पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केले. येथे सीसीटीव्ही कॉमेरे, ई लायब्ररी, वाचनालय, ग्रंथालय आणि दोन खोल्यांची बांधणी केली. स्पर्धा परीक्षा केंद्राचे काम प्रस्तावित आहे.
राजसिंह शेळके, विद्यमान नगरसेवक
चौकट
पाच वर्षांत झालेली विकासकामे
मुक्त सैनिक गार्डन येथे दहा लाखांच्या निधीतून स्मारक
रसिका हॉटेल ते सफायर पार्क रस्ता
मुक्त सैनिक रिक्षा स्टॉप ते रंजन रेसिडेन्सी रस्ता
भोईराज कॉलनीतील संपूर्ण गटर
तीन ओपन स्पेस विकसित
घोडकेवाडीतील उद्यान विकसित
बापट कॅम्प स्मशानभूमीत शेड आणि स्वागत कमान
चौकट
शिल्लक असलेली कामे
गुरुनानक कॉलनी रस्ता खराब
रसिका हॉटेल ते सफायर पार्क चॅनेलचे काम
इंद्रजित कॉलनी ते जाधववाडी ओढ्याची पाईपलाईन लहान असल्याने सांडपाणी नागरिकांच्या घरांत
जाधववाडीतील गणेश कॉलनी येथील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न कायम
घोडकेवाडी, भोईराज कॉलनी, जयशिवराय कॉलनी येथील परिसर उंचावर असल्याने कमी दाबाने पाणी
प्रमुख चौकात हायमास्ट दिवे बसविणे
फोटो :३००१२०२१ कोल केएमसी मुक्त सैनिक वसाहत प्रभाग न्यूज १
ओळी : कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत प्रभागातील दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या सैनिकांचे कार्य नवीन पिढीला होण्यासाठी भव्य असे स्मारक उभारले आहे.
फोटो : ३००१२०२१ कोल केएमसी मुक्त सैनिक वसाहत प्रभाग न्यूज २
ओळी : कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत प्रभागातील जाधववाडी येथील महापालिकेच्या शाळेकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्ता खराब झाला आहे.