कोल्हापूर : गेल्या ४४ वर्षांपासून रखडलेली कोल्हापूरची हद्दवाढ होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना आज, मंगळवारी किंवा उद्या, बुधवारी राज्य शासनाकडून काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यालयाकडूनही त्यास दुजोरा दिला आहे. स्वत: पालकमंत्रीच हद्दवाढीस आग्रही असल्यामुळे हा निर्णय आता होणार हे स्पष्ट झाले.कोल्हापूरच्या नगरपालिकेची सन १९७२ ला महापालिका झाली. लोकसंख्या वाढत गेली तरी हद्दवाढ मात्र खुंटितच राहिली. या काळात राज्यात, महापालिका आणि जिल्हा परिषदेतही काँग्रेसचीच सत्ता राहिली; परंतु काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरत असल्याने त्यांनी हद्दवाढीबाबत कायमच दुटप्पी भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नागरीकरणाबाबत आग्रही राहिले तरी त्यांनीही कोल्हापूरच्या विकासाशी जोडल्या गेलेल्या या प्रश्नांबाबत ठोस भूमिका घेतली नाही; परंतु राज्यात भाजप सरकार आल्यानंतर मात्र या प्रश्नाला वेग आला व आता तो सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद निवडणुका आणि हद्दवाढकाही झाले तरी हद्दवाढीचा निर्णय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी व्हायला हवा होता. कारण एकदा तिथे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तर हद्दवाढ करण्यास अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे सप्टेंबरपूर्वी हा निर्णय घ्यावा, असे राज्य निवडणूक आयोगाचेच निर्देश होते म्हणूनही हा निर्णय तातडीने होत आहे. दुसरे एक महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूर महापालिकेत भाजप सत्तेपासून अगदी कमी जागांमुळे दूर राहिला आहे. हद्दवाढ झाल्यास नव्याने समाविष्ट भागात प्रभाग रचना होऊन तिथे निवडणूक होऊ शकते. सहा महिन्यांत या निवडणुका घ्याव्यात, अशी तरतूद आहे. त्यामुळे महापालिकेची सदस्यसंख्या वाढेल. तिथे राजकीय प्रभाव वापरून सत्तेचे गणित जमवण्याचेही भाजप-ताराराणी आघाडीचे प्रयत्न आहेत. महापालिका बरखास्त होऊन सर्वच शहराची नव्याने निवडणूक होणार अशीही चर्चा आहे. परंतु त्यास दुजोरा मिळू शकला नाही.अशी आहेत गावे...१) सरनोबतवाडी २) मुडशिंगी ३) गोकुळ शिरगाव ४) नागाव ५) पाचगाव ६) मोरेवाडी ७) उजळाईवाडी ८) नवे बालिंगे ९) कळंबे तर्फ ठाणे १०) उचगांव ११) आंबेवाडी १२) वाडीपीर १३) वडणगे १४) शिये १५) शिंगणापूर १६) नागदेववाडी १७) वळिवडे १८) गांधीनगर. शिरोली एमआयडीसी व गोकुळ शिरगाव एमआयडीसीचाही नव्या हद्दवाढीत समावेश व्हावा, असा महापालिकेचा आग्रह आहे.चंद्रकांतदादांमुळेच...!कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच स्वत: पुढाकार घेतला आहे. त्यांची राजकीय इच्छाशक्ती असल्यामुळेच गेली ४४ वर्षे रखडलेला हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आला आहे. स्वत: पाटील व राज्य सरकारही हद्दवाढीस आग्रही असल्यामुळे हा निर्णय होणार हे स्पष्टच आहे. त्याची कुणकुण लागल्यामुळेच भाजपकडून सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू झाले. आम्ही आंदोलन केल्यामुळे हद्दवाढ झाली, असे श्रेय मिळावे यासाठीच हे आंदोलन सुरू झाल्याचे चक्क भाजपचे नगरसेवकच आंदोलनस्थळी सांगत होते. त्यातील श्रेयवाद बाजूला ठेवला तरी हा तिढा सुटत आहे हे देखील महत्त्वाचे आहे. हद्दवाढ कशासाठी... शहराच्या हद्दीवरील गावांचे ना टाऊन प्लॅनिंग, ना नागरी सुविधा दिल्या जातात. ग्रामसेवक बांधकाम परवाना देतो. धड रस्ते नाहीत, ही गावे आज ना उद्या शहरात समाविष्ट होणारच आहेत; परंतु त्यांचा विकास नीट न झाल्यास नंतर त्यामध्ये सुधारणा करणे डोकेदुखी ठरेल. यातील अनेक गावांना पिण्याचे पाणी, वाहतुकीची सोय महापालिकाच करते. या गावांचे सगळे दळणवळण आणि विकासही शहरावर अवलंबून आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हद्दवाढ झाल्यास महापालिकेचे उत्पन्न वाढेल.नागाव, गांधीनगरबाबत संभ्रमावस्थाकोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याबाबत १८ गावे आणि दोन एमआयडीसींचा प्रस्ताव असला तरीही नागाव आणि गांधीनगर या दोन गावांबाबत निर्णय प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित ही दोन्हीही गावे दुसऱ्या टप्प्यात हद्दवाढीत समाविष्ट होतील. उर्वरित १६ गावे आणि दोन एमआयडीसींचा समावेश होईल.
‘हद्दवाढी’चा मार्ग मोकळा
By admin | Updated: July 26, 2016 00:43 IST