मुरगूड शहर आणि परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने येथील ग्रामीण रुग्णालयातच कोविड केअर सेंटर सुरू झाले. सुरुवातीला बाह्य रुग्ण विभाग बंद करून उपलब्ध सर्व कर्मचारी या कोरोना केअर सेंटरमध्ये कार्य करू लागले. सुमारे तीस बेड उपलब्ध असणाऱ्या या सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध केली होती. ही परिसराची आणि शहराची गरजही होती. त्यामुळे पहिल्या एक-दोन दिवसांतच या ठिकाणचे सर्व बेड फुल्ल झाले.
याशिवाय पालिका आणि रुग्णालय यांच्यावतीने मंडलिक महाविद्यालयात काळजी केंद्रही सुरू करण्यात आले आहे. लक्षणे नसणाऱ्या किंवा उपचार करून बरे झालेल्या रुग्णांना या ठिकाणी अलगीकरणात ठेवले जाते. त्यांचीही दररोज तपासणी या रुग्णालयातील अधिकारी करतात. त्यातच काही नागरिकांनी बाह्य रुग्ण सेवा सुरू करण्याची मागणी केल्याने तो विभागही सुरू करावा लागला. या सर्व ठिकाणी आहे तेच कर्मचारी काम करीत आहेत.
काही नवीन वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त होणे गरजेचे होते. पण या सेंटरला सुरू होऊन एक महिना होत आला तरी अजून नवीन नियुक्ती झाली नाही.
या सेंटरच्या उद्घाटनानंतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भेटी दिल्या. या कोरोना सेंटरसाठी लागणारे उपलब्ध मनुष्यबळ आणि साहित्य देण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप नवीन कर्मचारी याठिकाणी हजर झाले नाहीत. उपलब्ध कर्मचारी चांगली सुविधा देत आहेत. त्यामुळे रुग्णही खासगी मध्ये न जाता या सेंटरचा आधार घेत आहेत. त्यामुळे रुग्णांना अति उत्तम सेवा मिळण्यासाठी तत्काळ लागणारे कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे.