संदीप बावचे
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात ३४४२ रुग्णांपैकी २३८९ जणांनी कोरोनावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना कोरोनाला हरविण्यासाठी कुठेतरी यश मिळत असल्याचे चित्र आहे. सध्या ९७३ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी शासनांच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
एकीकडे शिरोळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्णांना बेड मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मे महिन्यातील पंधरवड्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर अशीच दिसून आली. त्यामुळे १ एप्रिल ते २२ मे अखेर ३४४२ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांपैकी २३८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ८० रुग्णांचा मृत्यू झाला असून, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ९७३ आहे.
रोज शंभरहून अधिक रुग्णांची भर आणि त्यातच मृत्यू होत असल्याने भीतिदायक चित्र होते. कडक लॉकडाऊनचा थोडासा परिणाम झाल्याने रुग्णसंख्या कमी येत आहे. शिरोळ तालुक्यात तीन शासकीय कोविड सेंटर आहेत, तर लोकवर्गणीतून कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. खासगी कोविड सेंटरची संख्याही मोठी आहे. ग्रामसमित्याही सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
अॅन्टिजनमध्ये ४६ पॉझिटिव्ह
आस्थापनासह विविध शासकीय कर्मचाऱ्यांची अॅन्टिजन तपासणी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. यामध्ये दोन दिवसांत १४८५ जणांची अॅन्टिजन तपासणी केली असून ४६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी पाठविले आहे.
जयसिंगपुरात अॅन्टिजन तपासणी
शहरातील अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना अॅन्टिजन तपासणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून नियोजन सुरू झाले आहे.