कोल्हापूर/सरवडे : सरवडे (ता. राधानगरी) येथे स्पिरिटपासून तयार करण्यात येणाऱ्या भेसळयुक्त, बनावट देशी दारूअड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी आज, गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास छापा टाकून आंतरराज्यीय गुन्हेगारासह दोघांना अटक केली. संशयित आरोपी सुनील बाळू भाटळे (वय ३६, रा. निपाणी, जि. बेळगाव), त्याचा साथीदार सुरेश साताप्पा कांबळे (३८, रा. सरवडे, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक राजेश कावळे यांनी दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले, महाराष्ट्र-कर्नाटक पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सुनील भाटळे याचा बेळगाव व कोल्हापूर पोलीस शोध घेत होते. दरम्यान, सरवडे येथे भाटळे याने पारंपरिक बनावट देशी दारू बनविण्याचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहकारी जगन्नाथ पाटील, सचिन भवड, प्रकाश पाटील, मिलिंद गरुड, पांडुरंग कुडवे, सविता हजारे, आदी सहकाऱ्यांसमवेत सरवडे येथे गोपनीय माहिती मिळविली असता सुरेश कांबळे याच्या घरी भाड्याने खोली घेऊन तो दारू तयार करीत असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस येथील बाळूमामा भक्त निवासमध्ये आठ दिवस वेशांतर करून पाळत ठेवून होते. आज सकाळी मुख्य सूत्रधार भाटळे हा या ठिकाणी आला असता छापा टाकून त्याला रंगेहात पकडले. यावेळी सहआरोपी म्हणून घरमालक सुरेश कांबळेला अटक केली. भाटळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये गुन्हे दाखल आहेत. पंधरा दिवसांपूर्वी स्पिरिट चोरीप्रकरणी त्याच्यावर कर्नाटक पोलिसांत गुन्हा दाखल आहे. कर्नाटकात देशी दारूविक्रीला बंदी असल्याने सरवडे याठिकाणी दारू तयार करून तो सीमाभागातील व कर्नाटकातील काही गावांत दारूची विक्री करण्याच्या तयारीत होता. त्याचे रॅकेट मोठे असून याबाबत सखोल माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असेही कावळे यांनी सांगितले. जप्त केलेला माल असा : स्पिरिट ५०० लिटर, प्लास्टिक बॅरल व कॅन, रिकाम्या बाटल्या - १० हजार, पत्र्याची बुचे, तयार देशी दारूच्या ४८ बाटल्या, कागदी लेबल्स, फिलिंग मशीन, अॅल्युमिनियम प्लेट्स, स्वाद व अर्क, रबरी होज पाईप, डिंक बाटली, चिकट टेप. मद्य ब्लेंड
सरवडेत दारूअड्ड्यावर छापा दोघांना अटक
By admin | Updated: November 21, 2014 00:33 IST