कोल्हापूर : नायब तहसीलदार पदाला राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात आला असून ग्रेड-पे मात्र ‘वर्ग-३’च्या पदाचा देण्यात आला आहे. त्यामुळे नायब तहसीलदार पदाचा ‘ग्रेड पे’ वाढवून ४६०० रुपये करण्यात यावा. यासह विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ आज, बुधवारी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेने ‘काम बंद’ आंदोलन केले. जिल्ह्यातील ८०० हून अधिक महसूल कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालये, प्रांत कार्यालयांमधील कामकाज ठप्प होते. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.कर्मचारी संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यांबाबत वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे. परंतु अद्याप न्याय न मिळाल्याने संघटनेतर्फे राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानुसार आज जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी आपापल्या कार्यालयातील ‘काम बंद’ करून जिल्हाधिकारी कार्यालयात एकवटले. जिल्हाधिकारी कार्यालयातील काम बंद असल्याने शुकशुकाट जाणवत होता. या ठिकाणी महाराणी ताराराणी सभागृहात बैठक होऊन संघटनेच्या सूचनेनुसार १४ जुलैला ‘लेखणी बंद’ आंदोलन व १ आॅगस्टच्या बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.लिपिकाचे पदनाम बदलून त्याला ‘महसूल-साहाय्यक’ असे पदनाम देण्यात यावे. महसूल विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे सेवाकालापासून सेवानिवृत्तीपर्यंत एकाच पदावर कार्यरत राहत असल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या एका मुलाला खात्यामध्ये नोकरीसाठी सहानुभुतीपूर्वक विचार व्हावा. राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा. अनुकंपा तत्त्वावरील सेवाभरतीची ५ टक्के अट रद्द करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील देसाई, सरचिटणीस विलास कुरणे, उपाध्यक्ष प्रीती ढाले, कोषाध्यक्ष आर. आर. पाटील, विनायक लुगडे, संदीप पाटील, सचिन सवळेकरी, सुनीता हुजरे-पाटील, विद्या शिंदे, अविनाश सूर्यवंशी, दीपक खाडे, तेजपाल गोलगंडे, प्रकाश कुरणे, गणेश बरगे, सतीश ढेंगे, राजेंद्र नाळे, रोहन पाटील, आदींसह कर्मचारी सहभागी झाले.
महसूलचे कामकाज ठप्प
By admin | Updated: July 10, 2014 00:51 IST